

मुंबई: मुंबईतील नौदलाच्या आयएनएस शिक्रा एअर स्टेशन परिसरासह आझादनगर आणि सुंदरनगर भागात पतंग उडविण्यास मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. विमानांच्या उड्डाण, उतरणे आणि हवेत झेपावण्याच्या मार्गात पतंग आल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे हा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनी हा आदेश जारी केला आहे. सदर आदेश १६ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून १४ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
पश्चिम नौदल कमांडच्या नियंत्रणाखालील आझादनगर आणि सुंदरनगर परिसरात पतंग उडविले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आयएनएस शिक्रा येथून विमानांचे नियमित उड्डाण आणि लँडिंग सुरू असते.
अशा वेळी पतंग विमानाच्या मार्गात आल्यास विमानाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या परिसराला ‘फ्री फ्लाइट झोन’ ठेवण्यासाठी पतंग उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे.
विमानांच्या हालचालींना धोका निर्माण करणारी बाब आढळल्यास नागरिकांनी त्याची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.