

राजेंद्र पाटील
नवी मुंबई: मुंबई एपीएमसीतून आठवड्याभरात ६०० ते ६५० ट्रक म्हणजे सुमारे साडेतीन कोटी नारळांची विक्री गणेशोत्सवाच्या कालावधीत होईल. पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, कोकणासह राज्यभरात सुमारे सहा कोटींच्यावर नारळाची विक्री होण्याची शक्यता आहे.
तसेच यावर्षी नारळाच्या दर गेल्या वर्षीपेक्षा ५ ते ६ रुपयांनी स्वस्त झाल्याची माहिती एपीएमसीतील घाऊक नारळ व्यापारी धनंजय काळे यांनी दिली.
सोमवारी १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गोकुळाष्टमी होताच एपीएमसीत गणेशोत्सवासाठी नारळ खरेदीला सुरुवात होते. कोकणात गेल्या आठवड्यात १५० गाडी नारळ थेट विक्रीसाठी मागविण्यात आला आहे.
आंध्रप्रदेश आणि केरळमधून नारळाची आवक यावर्षीशी नसून कर्नाटकातून १० टक्के तर तामिळनाडू राज्यातून सर्वाधिक ९० टक्के नारळाची आवक मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
काही उपनगरात आणि जिल्ह्यांत थेट या राज्यांतून नारळाचे ट्रक विक्रेते मागवितात. ऐरवी एपीएमसीतून मुंबईसह उपनगरांत ४० ते ४५ ट्रक नारळ पाठविले जातात. मात्र गणेशोत्सवाच्या काळात नारळाला वाढती मागणी असल्याने आवकमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. एका ट्रकमध्ये सुमारे २३ हजार म्हणजे ८ हजार गोणी नारळाची आवक होते. १६ टन नारळाच्या गाडीचे भाडे ३८ हजार आहे, अशी माहिती काळे यांनी दिली.
नारळ विक्रीत नवसाचे, मोदकासाठी आणि घरगुती वापरासाठी लागणाऱ्या नारळांचा समावेश आहे. नवस फेडणार्यांची संख्या दरवर्षां लाखांवर असते. त्यामुळे नवसासाठी लागणार्या लहान आणि मध्यम आकाराच्या नारळाला व्यापार्यांनी, किरकोळ विक्रेत्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे, असेही ते म्हणाले.
येथून होते आवक
तामिळनाडूमधून पेराऊरनी, पटूकोटीई, कोलाची, ऐलूर, पलन्नी येथून मोठ्या प्रमानावर नारळाची आवक सुरु आहे. तर केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील नरसापूर व पालकोल येथून यावर्षी आवक नाही.
लहान नारळ किरकोळ बाजारात २५ रुपये आणि मध्यम नारळ ४० रुपयांना विकला जात आहे. ठोक खरेदीदाराला २१ ते २५ रुपये नगाप्रमाणे घाऊक बाजारातून नारळांची विक्री केली जाते. नारळाचा कुठलाही तुटवडा भसणार नाही, एवढा साठा एपीएमसीतील चाळीस घाऊक व्यापार्यांनी केला आहे.