

मुंबई : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर लादलेल्या युध्दाच्या मोठ्या झळा देशातील हॉटेल व्यावसायिकांना बसत आहेत. त्यांचा व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. मात्र याच व्यावसायिक सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्यामुळे हॉटेल चालकांना सिलिंडरचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे मुंबईतील 40 टक्केपेक्षा जास्त हॉटेल्स बंद झाली आहेत. परिणामी हॉटेल व्यवसाय धोक्यात आला असून सरकारने व्यावसायिक सिलिंडरचा काळाबाजार बंद करावा अशी विनंती आहार या हॉटेल चालकांच्या संघटनेमार्फत करण्यात आली आहे.
व्यावसायिक सिलिंडरचा हॉटेल व्यवसायिकांना तुटवडा भासत असताना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे छोट्या हॉटेल चालकांना गॅस उपलब्ध होत नाही. काही हॉटेल चालकांनी हॉटेल सुरू ठेवण्यासाठी इंडक्शन चुला व कोळशाचा वापर सुरू केला आहे. पण जागेअभावी छोट्या हॉटेल चालकांना पर्याय निवडणे शक्य नाही. त्यामुळे अशी हॉटेल बंद झाली आहेत. केंद्र व राज्य सरकारने हॉटेलला गॅस उपलब्ध करून देण्यासाठी काळाबाजार थांबवायला हवा, असेही आहार संघटनेने म्हटले आहे.
काही हॉटेल चालकांना खासगी ठेकेदारामार्फत व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत आहेत. जर खासगी ठेकेदार सिलेंडर उपलब्ध करून देत असतील तर हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम यांच्याकडे गॅसचा तुटवडा का, असाच सवाल आहारचे विधी विभागाचे अध्यक्ष निरंजन शेट्टी यांनी केला आहे. सध्या बाजारात 1500 रुपयाला मिळणारा व्यावसायिक सिलेंडर 4 ते 5 हजार रुपयाला खरेदी केला जात आहे. एवढ्या मोठ्या किमतीने गॅस सिलेंडर खरेदी करणे छोट्या हॉटेलधारकांना शक्य नाही. त्यामुळे हॉटेल व्यवसाय
वाचवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलून प्रत्येक हॉटेलला सिलेंडर मिळेल, याची दक्षता घ्यावी असेही शेट्टी आणि सांगितले.
व्यावसायिक सिलिंडर्सचा पुरवठा बंद केल्यामुळे अडचणीत आलेल्या मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांनी त्यांचे वार्षिक परवाना शुल्क स्थगित करावे किंवा ते भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी विनंती राज्य सरकारला केली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन (पश्चिम भारत) या संघटनेने उपमुख्यमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून शुल्क भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी अशी विनंती केली आहे.
खाद्य तेलाची पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे आठवडाभरातच खाद्यतेलाचे दर किलोमागे 13 ते 15 रुपयांनी वाढले आहे. त्याचबरोबर तळणीचे पदार्थदेखील महागले आहेत. पामतेल 120 वरून 135 रुपये, सुर्यफूल तेल 140 वरून 155, शेंगदाणा तेल 180 वरून 190 रुपयांवर गेले आहे.
मुंबई शहर व उपनगरात सुमारे 8 हजार हॉटेल्स नोंदणीकृत आहेत. यापैकी 40 टक्के म्हणजे सुमारे 3 हजार 200 हॉटेल सिलिंडरअभावी बंद पडली आहेत. त्याशिवाय शहरात नोंदणीकृत नसलेली हजारो लहान मोठी हॉटेल्स आहेत. अशा हॉटेल्सना होणारा सिलिंडर पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ही हॉटेल बंद होत आहेत. येणाऱ्या काळात सिलिंडरचा पुरवठा न झाल्यास 80 टक्के हॉटेल व्यवसाय बंद पडेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.