

मुंबई : अधिकृत फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेला फेरीवाला क्षेत्र निश्चित करावे लागणार आहे. मात्र हे क्षेत्र निश्चित करताना, स्थानिक नागरिकांचा विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेरीवाला क्षेत्र निश्चित करणे पालिकेसाठी अवघड ठरणार आहे.
मुंबई शहर व उपनगरात जवळपास ९९ हजार ४३५ फेरीवाले अधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. या अधिकृत फेरीवाल्यांना महापालिकेतर्फे क्यूआर कोड असलेल्या ओळखपत्राचे वाटप करण्यात येत आहे. पण या अधिकृत फेरीवाल्यांना बसवण्यासाठी महापालिकेला फेरीवाला क्षेत्र निश्चित करावे लागणार आहे.
रेल्वे स्टेशनपासून १५० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना बसवण्यास कोर्टाचे मनाई आदेश आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशनजवळ फेरीवाला क्षेत्र घोषित करणे शक्य होणार नाही. त्यामुळे निवासी भागात फेरीवाला क्षेत्र निश्चित करावे लागणार आहे. पण कोणीही आपल्या परिसरात फेरीवाल्याला येऊ देणार नाही. त्यामुळे फेरीवाला क्षेत्र निश्चित करताना, मुंबईकरांचा रोज महापालिका प्रशासनाला ओढावून घ्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे यावेळी राजकीय पक्षांकडूनही हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे.
दादरमध्ये सर्वांधिक फेरीवाले
दादरमध्ये सर्वाधिक ओळखपत्रधारक फेरीवाले आहेत. ही संख्या सुमारे एकूण अधिकृत फेरीवाल्यांच्या २५ ते ३० टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देण्याचा मोठा प्रश्न उद्भवणार आहे. अधिकृत जागा उपलब्ध करून देण्यासाठी दादर जी-उत्तर विभागातील दादर, शिवाजी पार्क, माहीम आदी भागातील जागांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. पण येथे जोरदार विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फेरीवाला क्षेत्र निश्चितीसाठी अनेक जागांचा अभ्यास
फेरीवाला क्षेत्र परस्पर निश्चित न करता, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन ते निश्चित करण्यात येईल. यासाठी हरकती सूचना मागवण्यात येतील. यावेळी मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यास पर्यायी जागा शोधावी लागणार आहे. त्यामुळे फेरीवाला क्षेत्र निश्चित करताना, त्या त्या विभागातील अनेक जागांचा अभ्यास करावा लागणार आहेत. त्यामुळे क्षेत्र निश्चित करण्यासाठी अजून काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.
९९ हजार अधिकृत फेरीवाले
अधिकृत ९९ हजार ४३५ फेरीवाल्यांना ठीकठिकाणी सामावून घ्यायचे असेल तर, मोठी जागा व्यापणार आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या ज्या विभागात अधिकृत फेरीवाले आहेत त्यांना त्याच विभागात जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.
या जागा पदपथावर उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना भर रस्त्यावर चालावे लागेल. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या फेरीवाल्यांना जेथे मंडई व दुकाने असतील अशा ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध करून दिल्यास फारसा विरोध होणार नाही.