

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली असून यावेळी 1 कोटी 3 लाख 44 हजार 315 मतदार आपल्या निवडणुकीचा हक्क बजावणार असले तरी, सुमारे 1 लाखापेक्षा जास्त दुबार नावे वगळली जाणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात 1 कोटी 2 लाख मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार ही संख्या सुमारे 11 लाखाने वाढली. पण या दुबार नावे असलेले अनेक मतदार असल्यामुळे या मतदारांना एकाच ठिकाणी मतदानाचा कर देण्यात येणार आहे. यासाठी दुबार नावे वगळण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. आतापर्यंतच्या तपासणीमध्ये 50 हजारापेक्षा जास्त दुबार नावे असलेले मतदार आढळून आले. अजून 40 टक्के पेक्षा जास्त मतदारांची छाननी करायची आहे. त्यामुळे दुपार मतदारांची संख्या 1 लाखाच्या घरात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण मतदारांमधून दुबार नावे असलेले 1 लाख मतदार वगळल्यास जवळपास 1 कोटी 2 लाख 44 हजार 315 मतदार शिल्लक राहतात. ही संख्या 2017 च्या महापालिका निवडणुकीपेक्षा 11 लाखाने जास्त आहे.
2012 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 1 कोटी 2 लाख 86 हजार 579 मतदार होते. यात 57 लाख 20 हजार 306 पुरुष तर महिलांची संख्या 45 लाख 66 हजार 273 इतकी होती. 2017 मध्ये 91 लाख 80 हजार 497 मतदार होते. यात 50 लाख 30 हजार 363 पुरुष तर महिलांची संख्या 41 लाख 49 हजार 753 इतकी होती.