

कांदिवली : गोराई खाडीवरून पलीकडे जाण्यासाठी रविवारी सकाळपासूनच गोराई कोळी बांधवांच्या बोटी आणि वॉटर किंगडम व्यवस्थापनाच्या बोटींसाठी पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बोटीतून कुटुंबियांसमवेत तसेच स्वतःचीं दुचाकी घेऊन पर्यटकांनी गोराई बीच, पॅगोडा, वॉटर किंगडमसह वातावरणातील गारव्याचा मनसोक्त आनंद लुटला.
गोराई खाडीच्या पलीकडे गोराई बीच, पॅगोडा आणि वॉटर किंगडम हे पर्यटकांसाठी आवडती ठिकाणे आहेत. वर्षाचा शेवटचा महिना, आठवड्याची रविवारची सुट्टी, हवेतील गारवा आदींचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी रविवारी सकाळपासूनच बोटीतून प्रवास करण्यासाठी पर्यटकांच्या आणि दुचाकीस्वारांच्या रांगा लागल्या होत्या. गोराई बीच आणि पॅगोडा येथे जाण्यासाठी गोराई कोळी बांधवांच्या बोटी तसेच वॉटर किंगडमला जाण्ााऱ्या व्यवस्थापनाच्या बोटी पर्यटकांनी तुडुंब भरून ये -जा करत होत्या. बोटिंमध्ये स्वतःची दुचाकी घेऊन तसेच कुटुंबियांसमवेत पाण्याच्या लाटा, उडणारे पक्षी सोनेरी पॅगोडा पाहण्याचा आनंद काही वेगळाच.
पॅगोडामध्ये मनःशांती केंद्र असून, प्रवेश करताच मनाला एक वेगळी अनुभूती अनुभवयास मिळते. सहलीला येणाऱ्या पर्यटकांची गाणी ऐकत बोट केव्हा पलीकडच्या धक्क्याला लागते ते कळतच नाही. हलणाऱ्या बोटीतून उतरताना भितीयुक्त आनंद घेत काही पर्यटकांनी गोराई खाडीवर आनंद लुटला तर कोणी पॅगोड्यात जाऊन मनःशांतीचा अनुभव घेतला.काही पर्यटकांनी वॉटर किंगडममध्ये जाऊन पाण्यातील विविध खेळांचा आनंद घेतला. रविवारी येणाऱ्या पर्यटकांमुळे गोराई येथील व्यावसायिक, मासे, गावरान भाजी, नारळ आणि तडगोळे विक्री करणाऱ्या कोळी महिलांच्या व्यवसायातही चांगलीच भर पडली.