

मुंबई: मलबार हिल येथील ऐतिहासिक फिरोजशाह मेहता उद्यानातील (हँगिंग गार्डन) परिसरातील ८४ झाडे तोडण्याचा व स्थलांतरित करण्याचा घाट मुंबई महानगरपालिकेने घातला आहे.
याबाबतची सूचना थेट वर्तमानपत्रात न देता, चक्क झाडांच्याच खोडावर चिकटवण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हायड्रॉलिक इंजिनिअरच्या बंगल्यासमोर, खालील जंगलात आणि गार्डनच्या कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सजवळील झाडांवर या नोटिसा दिसून आल्या आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरणाची सूचना दिनांक ४ ऑक्टोबरची आहे. आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ (जानेवारी २०२५ पर्यंत सुधारलेला) कलम ८(३)(क) मधील तरतुदीनुसार ही नोटीस देण्यात आली आहे.
त्यानुसार मलबार हिल बी.जी. खेर मार्ग येथील फिरोजशाह मेहता उद्यानात जलाशयाच्या नवीन गॅलरीसह अतिरिक्त जलाशयाच्या प्रस्तावित बांधकामानुसार, एमएचआर कंपार्टमेंट-३ तसेच व्हॉल्व्ह गॅलरीच्या बांधकामात येणारी झाडे काढण्यास प्रस्तावित केली आहेत. तसेच झाडांचे अनुक्रमांकही नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.
पालिकेने याबाबत बातमीद्वारे जनतेला कळवले आहे का? आपल्यापैकी कोणीही आक्षेप मागवणारी जाहीर सूचना वर्तमानपत्रात पाहिली आहे का?" असा सवाल स्थानिक रहिवासी विचारत आहेत.
मलबार हिल येथील समाजसेवक संजय शिर्के यांनी सांगितले की, फक्त झाडांवर नोटीस चिकटवून औपचारिकता पूर्ण करण्याचा हा प्रकार म्हणजे नागरिकांना अंधारात ठेवून काम उरकण्याचा डाव असल्याचा आरोप होत आहे.
यावरून पालिकेचा हेतू अजिबात प्रामाणिक नाही. हँगिंग गार्डन हे मुंबईचे फुप्फुस मानले जाते. तिथे नवीन बांधकामासाठी ८४ झाडांचा बळी देणे योग्य आहे का? आणि जर ही झाडे वाचवण्याचा पर्यायी मार्ग उपलब्ध असेल तर तो का शोधला जात नाही? असे प्रश्न शिर्के यांनी उपस्थित केले आहेत.
किती झाडे जाणार?
कापणे : ४३ झाडे
पुनर्रोपित करणे : ४१ झाडे
एकूण : ८४ झाडे