

मुंबई : मुंबईत मेथॅम्फेटामाइनची (क्रिस्टल मेथ ) विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला अटक केल्यानंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मुंबई आणि उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एकूण ४.७१८ किलो मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे ९.४ कोटी रुपये आहे. या प्रकरणात आता दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन परदेशी महिलांचा शोध सुरू आहे.
एटीएसच्या काळाचौकी युनिटला मुंबईत मेथॅम्फेटामाइन विक्रीसाठी आणले जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने वांद्रे येथील अंबर हॉटेलजवळ सापळा रचला. संशयित व्यक्ती तेथे आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली. त्याच्याकडून २.०५ किलो मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले. या ड्रग्जची किंमत सुमारे चार कोटी रुपये आहे.
चौकशीतून ग्रेटर नोएडाचा पत्ता
अटक केलेल्या आरोपीची चौकशी केल्यानंतर या ड्रग्जच्या पुरवठ्याचा धागा ग्रेटर नोएडा येथे पोहोचला. मुंबईत आणलेला मेथॅम्फेटामाइनचा साठा तेथे तयार केला जात असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानंतर एटीएसच्या पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन संशयित ठिकाणी छापा टाकला.
या छाप्यात २.६६८ किलो मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले. या ड्रग्जची किंमत सुमारे ५.४ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. मुंबई आणि ग्रेटर नोएडा येथील कारवाईत एकूण ४.७१८ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले.
पुरवठा साखळीचा तपास होणार
ग्रेटर नोएड्यात ड्रग्जची निर्मिती कोण करत होते, कच्चा माल कुठून आणला जात होता आणि तयार केलेला मेथॅम्फेटामाइन मुंबईत कोणाच्या माध्यमातून पाठवला जात होता, याचा तपास एटीएस करत आहे. मुंबईत हा साठा कोणाला विकला जाणार होता, त्याचे ग्राहक कोण होते आणि या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचीही माहिती घेतली जात आहे. तपासातून या आंतरराज्य ड्रग्ज नेटवर्कमधील आणखी आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे.