

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन खरेदीसाठी विविध कंपन्यांकडून आकर्षक ऑफर्स, मोठ्या सवलती आणि ‘फ्री गिफ्ट’च्या जाहिराती सुरू झाल्या आहेत. याच संधीचा फायदा घेऊन सायबर ठगांकडून नागरिकांना व्हॉट्सॲप किंवा एसएमएसवर बनावट ऑफर पाठवून लिंकवर क्लिक करण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते.
या लिंकच्या माध्यमातून वैयक्तिक अथवा आर्थिक माहिती मिळवून फसवणूक करण्याचा धोका आहे. त्यामुळे ‘फ्री गिफ्ट’, ‘स्पेशल ऑफर’ किंवा मोठ्या डिस्काउंटच्या आमिषाला भुलण्यापूर्वी त्याची खातरजमा करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
सायबर ठगांकडून प्रसिद्ध कंपन्यांच्या नावाने संदेश पाठवले जातात. या संदेशांमध्ये गिफ्ट मिळवण्यासाठी किंवा विशेष सवलतीचा लाभ घेण्यासाठी लिंक देण्यात येते. लिंक उघडल्यानंतर ग्राहकाला बनावट वेबसाइटवर नेले जाऊ शकते. त्यानंतर गिफ्ट मिळवण्यासाठी जीएसटी, डिलिव्हरी चार्ज किंवा छोट्या शुल्काच्या नावाखाली पेमेंट करण्यास सांगितले जाऊ शकते.
काही वेळा बनावट वेबसाइट हुबेहुब मूळ कंपनीच्या वेबसाइटसारखी दिसते. त्यामुळे केवळ कंपनीचा लोगो किंवा नाव पाहून वेबसाइट खरी असल्याचे समजू नये. त्यामुळे संदेशामधील लिंकवर क्लिक करण्याऐवजी संबंधित कंपनीची अधिकृत वेबसाइट किंवा अॅप स्वतः उघडून ऑफर उपलब्ध आहे का, हे तपासणे सुरक्षित ठरणार आहे.
‘फ्री गिफ्ट’च्या आमिषाला अभिनेत्रीही बळी
‘अंगुरी भाभी’ या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री शुभांगी अत्रे यांनाही याआधी ‘फ्री गिफ्ट’च्या आमिषातून ऑनलाइन फसवणुकीचा सामना करावा लागला होता. त्या एका कंपनीच्या ‘प्रीमियम मेंबर’ असल्याचे सांगून त्यांना मोफत भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर गिफ्ट मिळवण्यासाठी जीएसटी भरण्याच्या नावाखाली बनावट लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकवरून व्यवहार केल्यानंतर त्यांच्या खात्यातून पैसे काढले गेले होते. या बाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती.
फ्रीच्या नावाखाली पेमेंटचा सापळा
‘फ्री गिफ्ट’ देण्याच्या नावाखाली सुरुवातीला कोणतीही रक्कम मागितली जात नाही. मात्र पुढे जीएसटी, कुरिअर शुल्क, रजिस्ट्रेशन फी किंवा अन्य शुल्क भरण्यास सांगितले जाऊ शकते. अशा वेळी ग्राहकाने तातडीने पैसे भरण्याऐवजी ऑफरची सत्यता तपासावी.
सायबर पोलिसांचा सावधानतेचा मंत्र
फ्री गिफ्ट दिसले → लगेच क्लिक नको!
व्हॉट्सॲप किंवा एसएमएसवरील अनोळखी लिंक उघडू नका.
ऑफर अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवर तपासा.
`वेबसाइटच्या स्पेलिंग आणि डोमेनची खातरजमा करा.
ओटीपी, यूपीआय पिन, सीव्हिव्हि(डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरील सुरक्षा क्रमांक) किंवा पासवर्ड कोणालाही देऊ नका.
अनोळखी अॅप किंवा एपीके डाउनलोड करू नका.
‘आत्ताच ऑफर संपणार’ असा दबाव आणला जात असेल तर सावध राहा.
फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधा.