

कोलाड : विश्वास निकम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील सुकेली खिंडीच्या पायथ्याशी खांब गावाच्या हद्दीत टोल गेटचे काम अंतिम टप्यात आहे. हा टोल घेण्यासाठी केव्हाही सुरुवात केली जाऊ शकते. महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम अद्याप ही अर्धवट स्थितीत असुन या महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल भरणार नाही असा वाहन चालकांकडून इशारा देण्यात आला आहे.
टोल टॅक्स रस्ते, पुल, बोगद्याची बांधणी आणि देखभालीसाठी वापरला जातो. या सुविधांचा वापर करणाऱ्या वाहनांकडून टोल टॅक्स गोळा केला जातो. सरकारने निश्चित केलेल्या नियमानुसार टोल टॅक्सची रक्कम ही वाहनांचा प्रकार, प्रवास केलेले अंतर, दिवसाच्या वेळेनुसार ठरते. टोल टॅक्स भरल्याने रस्ते व इतर सुविधांची देखभाल चांगली राहते आणि त्यांची गुणवत्ता टिकून राहते. चांगल्या रस्त्यामुळे प्रवास करणे सोपे जाते.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम गेली १८ वर्षांपासून सुरु आहे. अनेक ठेकेदार गेले अनेक आले. लोकनेत्यांकडून अनेक वेळा डेडलाईन देण्यात आल्या. प रंतु मुंबई गोवा हायवेच्या चौपदरी करणाचे काम पूर्ण होईना ? महामार्गाच्या रस्त्याची परिस्थिती जैसे थे। अशीच आहे. मग महामार्गाचे काम पूर्ण करण्याच्या अगोदर टोल गेटची घाई का? अशी संतप्त वाहन चालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या चार दिवस पडलेल्या तुफान पावसामुळे मुंबई-गोवा हायवे पूर्णपणे खड्डयात गेला आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. तर अर्धवट रस्त्यामुळे एक महिन्या पासून कोलाड, इंदापूर, माणगाव, दरम्यान वाहतूक कोंडी निर्माण होतांना दिसत आहे. तर दोन दिवसापूर्वी खांब जवळ एक बस खड्ड्यात गेली होती. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ही कामे पूर्ण न करता टोल गेटचे काम पूर्ण केले जाते हे कसले नियोजन असे प्रवासीवर्गातून बोलले जात आहे.