

मुंबई : भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे (क्रिएटर इकॉनॉमी) जागतिक केंद्र बनविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.
गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरातील प्राईम फोकसच्या नव्या अत्याधुनिक स्टुडिओमुळे या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून, मुंबई सर्जनशील उद्योगांचे जागतिक केंद्र म्हणून अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
फिल्मसिटी परिसरात प्राईम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री अॅड. आशिष शेलार, केंद्रीय सचिव चंचल कुमार, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रपट नगरी (फिल्मसिटी) च्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील व प्राईम फोकस समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमापूर्वी फिल्मसिटीच्या प्रशासकीय कार्यालय परिसरातील दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचबरोबर 'एक पेड माँ के नाम' अंतर्गत वृक्षारोपण केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईत जागतिक दर्जाची सुविधा उभारून जगभरातील मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगांना सेवा देण्याचा प्राईम फोकसचा संकल्प आज प्रत्यक्षात उतरला आहे.
शासनाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य केल्याचे सांगून 'वेव्हज २०२५' परिषदेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानंतर अवघ्या एका वर्षात या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला, ही उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहासामध्ये असंख्य प्रेरणादायी कथा दडलेल्या आहेत. या कथा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सक्षम सर्जनशील परिसंस्थेची गरज आहे.
प्राईम फोकसची ही सुविधा त्या दृष्टीने देशासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जगातील सर्वात मोठ्या चित्रपट सहनिर्मिती प्रकल्पांपैकी एक असलेल्या 'रामायण' चित्रपटाची निर्मिती या स्टुडिओमध्ये होत असल्याचा विशेष उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चित्रपटाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. भारतीय सर्जनशीलतेचा जागतिक स्तरावरील उत्कृष्ट नमुना म्हणून हा चित्रपट ओळखला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
फिल्मसिटीचा व्यापक पुनर्विकास
युवा पिढीच्या सर्जनशील क्षमतेला वाव देणे, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे आणि मनोरंजन उद्योगासाठी सक्षम परिसंस्था उभारणे यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. फिल्मसिटीचे जागतिक दर्जाच्या सर्जनशील आणि मनोरंजन केंद्रामध्ये रूपांतर करण्याचा व्यापक पुनर्विकास आराखडाही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.