

मुंबई : 11 दिवस आपल्या लाडक्या भक्तांनी केलेली सेवा स्वीकारून गणपती बाप्पा शनिवारी गावाला निघणार आहेत. सकाळी 8 वाजल्यापासूनच लालबागच्या राजासह मुंबईचा राजा व सार्वजनिक गणपती बाप्पा विसर्जनासाठी रवाना होणार असून त्यांना निरोप देताना मुंबई बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमून जाणार आहे.
बाप्पाला विसर्जन स्थळी नेण्यासाठी ट्रक, पारंपारिक वाद्य सज्ज झाली आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच मुंबईत जल्लोषाचे वातावरण दिसून येईल. शनिवारी गिरगाव चौपाटीसह दादर, जुहू, सात बंगला, वेसावे, पवई तलाव व अन्य विसर्जन स्थळी गणेश भक्तांचा महासागर लोटणार आहे.
विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिकेचे 10 हजार अधिकारी व कर्मचारी विसर्जन स्थळी कार्यरत असतील. यंदा मूर्ती विसर्जनासाठी 70 नैसर्गिक स्थळांसह सुमारे 290 कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबईतील गणपती विसर्जनासाठी पोलीस सज्ज झाले असून शहरात दहा अतिरिक्त पोलीस आयुक्त, 37 पोलीस उपायुक्त, 61 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2990 पोलीस अधिकारी आणि 17 हजार 557 पोलीस अंमलदारांचा बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.
शुक्रवारी सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी आणि सह पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी पत्रकार परिषद घेत विसर्जनासाठी तैनात बंदोबस्ताची माहिती दिली.
मुंबई पोलिसांच्या मदतीला एसआरपीएफ पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, होमगार्ड,, महाराष्ट्र सुरक्षा बल, अॅण्टी ड्रोन पथक आदींची मदत घेण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीला एसआरपीएफ पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, होमगार्ड, महाराष्ट्र सुरक्षा बल सज्ज असेल.
क्युआरटीच्या पथक तैनात
विर्सजनाच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दहशतवादी हल्ल्याची भीती लक्षात घेवून क्युआरटीच्या पथकांसह दहशतवाद विरोधी कक्षाच्या कर्मचार्यांना तैनात ठेवण्यात आले आहे. कुठल्याही अफवांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवू नये. शांतता राखावी असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.
हेल्पलाईन वापरा
गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, क्राईम फ्रन्ट अशा विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आली आहे. शनिवारी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक घराबाहेर पडतात. या भाविकांना विशेषता महिलांना त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्या. छेडछाड करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करा, एकापेक्षा अधिक लैगिंक स्वरुपाचे गुन्हे असलेल्या आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना देण्यात आले आहे. कोणत्याही समस्या असल्यास मुंबईकरांनी मुंबई पोलिसांच्या 100 व 112 या क्रमांकावर कंट्रोल रुमशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
भरती-ओहटीवेळी सतर्क रहा
अनंत चतुर्दशी दिवशी शनिवार 6 सप्टेंबरला समुद्रात सकाळी 11.09 वाजता मोठी भरती असून यावेळी समुद्रात 4.20 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. सायंकाळी 5.13 ओहटी आहे. यावेळी लाटांची उंची 1.41 मीटर राहणार आहे.
रविवार 7 सप्टेंबरला पहाटे 5.06 वाजता ओहोटी असून सकाळी 11.40 वाजता भरती असणार आहे. यावेळी समुद्रात 4.42 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे विसर्जनासाठी येणार्या भक्तांनी भरती व ओहोटीदरम्यान सतर्क राहावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.