

सातारा : ‘गणपती बापा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ‘पुढच्या वर्षी लवकर या’, ‘बाप्पा निघाले गावाला... चैन पडेना आम्हाला’ अशा जयघोषात फुलांची उधळण करत, पारंपारिक वाद्यांच्या निनादात, ढोल-ताशांच्या गजरात अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील सुमारे 746 मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. 26 हजार 728 घरगुती बाप्पांनाही भक्तिभावाने निरोप देण्यात आला. दरम्यान, सातार्यातील मुख्य विसर्जन मिरवणूक शनिवार, दि. 6 सप्टेंबर रोजी निघणार आहे.
अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. सातार्यात सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते शंकर, पार्वती, गणेशाची आरती करून अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी मिरवणुकीला प्रारंभ झाला. शेटे चौकातील प्रकाश मंडळ यांच्या शंकर-पार्वती, गणेशाची मिरवणूक निघाली. त्यानंतर शहरातील मंडईचा राजा मंडळाची मिरवणूक सुरू झाली. गुरुवार पेठ येथील सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत केलेली फुलांची आरास लक्षवेधी ठरली.
भगवान विष्णूच्या हातातील शंख, चक्र यांचे दर्शन या फुलांच्या सजावटीतून कलाकारांनी रेखाटले होते. या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक गणेशाची मूर्ती मिरवणुकीमध्ये प्रतिष्ठापित करण्यात आली होती. माची पेठेतील बाल स्फूर्ती मंडळ, यादोगोपाळ पेठेतील अजिंक्यतारा गणेश मंडळ, केसरकर पेठेतील मयूर सोशल क्लब, पोवई नाका लोणार गल्लीतील गणेशोत्सव मंडळ, मल्हार पेठेतील गोल्डन मंडळ, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या गणेशाची मिरवणूक निघाली.
तसेच सातारा जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या बाल हनुमान गणेश मंडळाच्या मिरवणुकीत धोतर, शर्ट, डोक्यावर टोपी अशा पारंपरिक वेशात पोलिसांनी सहभाग घेत ‘मोरया’चा जयघोष केला. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मुख्य विसर्जन तळ्यात सातारा येथे 49 गणेश मंडळांच्या, तर संपूर्ण जिल्ह्यात 746 मंडळांच्या बाप्पांना व 26 हजार 728 घरगुती बाप्पांनाही निरोप देण्यात आला.