Mumbai FDA Action: मुंबईतील चार हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

मुंबईतील चार अन्न आस्थापनांमध्ये तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने संबंधित परवाने किंवा नोंदणी निलंबित केली.
Mumbai FDA Action
Mumbai FDA ActionPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबईतील चार अन्न आस्थापनांमध्ये तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्या परवाने अथवा नोंदणी निलंबित केली. कलिना येथील विद्यानगरी कॅम्पसमधील मे. अक्षय कटसा, गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर, बीकेसीमधील क्राफ्टपॅक हॉस्पिटॅलिटी प्रा. लि., जिओ वर्ल्ड ड्राइव्ह, दादर गोखले रोडवरील इंड्रो हॉटेल अँड रेस्टॉरंट, आणि चेंबूर येथील टिळकनगरमधील भगवती स्टोअर्स, राधिका रेसिडेन्सी, यांचा यात समावेश आहे.

नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत धडक तपासणी मोहीम राबविली. २५ आणि २७ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या तपासणीत शहरातील चार अन्न आस्थापनांमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्याने त्यांचे परवाने नोंदणी तात्काळ निलंबित करण्यात आली.

स्वयंपाकघरात झुरळे व किड्यांचा प्रादुर्भाव, वारंवार वापरल्याने काळवंडलेले आणि खराब झालेले खाद्यतेल, गंजलेली भांडी, अस्वच्छ ठिकाणी अन्नाची साठवणूक तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी एकच जागा व उपकरणांचा वापर होत असल्याचे तपासणीत आढळले.

Mumbai FDA Action
Mumbai Metro 7A Project: २६० कोटींची मेट्रो मार्गिका तोडावी लागणार? सल्लागाराचा दोष असल्याचे एमएमआरडीएकडून स्पष्टीकरण

कृत्रिम रंग, अजिनोमोटोचा अतिवापर

तपासणीदरम्यान खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग तसेच अजिनोमोटोचा अनियंत्रित आणि अतिवापर होत असल्याचे आढळले. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे खाद्यतेल वारंवार वापरल्याने काळवंडलेले आणि अतिप्रमाणात ऑक्सिडीकरण झालेले होते. अशा तेलाचा वारंवार वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

स्वयंपाकघर तसेच खाद्यपदार्थांच्या साठवणुकीच्या विविध भागांत झुरळे व किड्यांचा सक्रिय प्रादुर्भाव आढळला. त्यामुळे खाद्यपदार्थ दूषित होण्याचा धोका निर्माण झाला होता. अन्न तयार करण्याच्या ठिकाणी आवश्यक स्वच्छता राखली जात नसल्याचेही निदर्शनास आले.

शाकाहारी-मांसाहारी एकच जागा

शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी समान जागा,फळे चिरण्याचे आणि स्वयंपाकाची उपकरणे वापरली जात असल्याचे आढळले. त्यामुळे एका पदार्थातील दूषित घटक दुसऱ्या पदार्थात जाण्याचा धोका निर्माण झाला होता. आवश्यक स्वतंत्र व्यवस्था आणि स्वच्छता पद्धतींचे पालन होत नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

Mumbai FDA Action
Mrinaltai Gore Flyover: २४८ कोटींचा उड्डाणपूल वादात; निसरड्या रस्त्यामुळे अपघातांची मालिका

नागरिकांनी तक्रार करावी

संशय आल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. तक्रारीसाठी १८००२२२३६५ हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध आहे. अन्नपदार्थात भेसळ होत असल्याचा संशय असल्यास संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता, अन्नपदार्थाचे नाव आणि उपलब्ध माहिती देऊन तक्रार नोंदविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news