

मुंबई : प्रकाश साबळे
मुंबई शहरातील झोपडपट्ट्या, टोलेजंग इमारती आणि काचेच्या बंदिस्त कॉर्पोरेट कार्यालयाला आग लागल्यास बचाव कार्यासाठी तात्काळ घटनास्थळी दाखल होणार्या मुंबई महापालिकेच्या अग्निशामन दलातील जवानांच्या वाट्याला सेवानिवृत्तीनंतरही उपेक्षा आल्या आहेत. निवृत्तीनंतरही मिळणारी पेन्शन, ग्रॅच्युइटीसह इतर सेवांपासून ते वंचीत आहेत.
प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारांमुळे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून सुमारे 150 पेक्षा अधिक सेवानिवृत्तीधारकांची पेंन्शन, ग्रॅज्युएटी, सेवाकाळात शिल्लक रजेचा पगारासह 6 वा आणि 7 वा वेतन आयोगाचा लाभ आदींपासून महापालिकेचे सेवानिवृत्त मुंबई अग्निशमन दलातील जवान दुर्लक्षित आहेत. त्यांच्या मागण्यांकडे वेळोवेळी अग्निशामन दल प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सेवानिवृत्तीधारकांनी केला.
मुंबई महानगरपालिकेचे 35 अग्निशामन केंद्र व 6 प्रादेशिक समादेशन केंद्र आहेत. या ठिकाणी कार्यरत असलेले जवान प्रत्येक वर्षी निवृत्ती होत असतात. मात्र महापालिकेच्या लालफीतीच्या कारभारामुळे त्यांना 5 वर्षांनंतरही निवृत्ती वेतनासह कुठल्याही लाभ मिळालेला नाही. परिणामी त्यांना मुंबई महापालिकेच्या मुख्यालय आणि भायखळा येथील मुंबई अग्निशामन मुख्यालयात पायपीट करावी लागत आहे. याकडे महापालिका प्रशासक तथा आयुक्त भूषण गगराणी यांनी लक्ष देण्याची मागणी आता निवृत्तीधारक अग्निशामन जवानांकडून केली जावू लागली आहे.
मुंबई अग्निशमन दलातून दीड वर्षात सेवानिवृत्त झालेल्या 115 जवानांना त्यांची सेवानिवृत्तीनंतर मिळणारी संपूर्ण रक्कम व पेन्शन मिळालेली नाही. त्यामुळे या जवानांसमोर उदारनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही महिन्यांपूर्वी मोहन मोरे नावाच्या एका जवानाला निवृत्तीनंतर 7 ते 8 महिने पेन्शन न मिळाल्यामुळे संसार कसा चालवावा या तणावामुळे त्यांचे निधन झाले होते. तरीही मुंबई अग्निशामन प्रशासनाला जाग आलेली नाही. प्रशासनातील अधिकारी वर्ग फाईल प्रलंबित ठेवून निवृत्तीधारकांची थट्टा करत असल्याची खंत काही निवृत्तीधारकांनी दै.पुढारीशी बोलताना व्यक्त केली.
पेन्शन दरबार बंद
अग्निशामन दलातील निवृत्तीधारकांना लवकरात लवकर पेन्शन मिळावी, यासाठी सुरू असलेला पेन्शन दरबार 4 वर्षांपासून बंद आहे. यामुळे कुठलीही सुनावणी होत नसल्याने प्रशासनाचे चांगलेच फावले आहे. यामुळे आता पेन्शन दरबार सुरू करण्याची मागणीही निवृत्त अग्निशामन जवानांनी केलीआहे.
हे आहेत जबाबदार
मुंबई अग्निशामन दलातील निवृत्तीधारक जवानांना वेळेवर पेन्शनसह इतर सेवा न मिळण्यास अग्निशामन दलातील प्रशासकीय अधिकारी, पगारपत्रक 26/11 आणि 26/12 जबाबदार असल्याचा आरोप काही निवृत्तीधारकांनी केला आहे.
या सेवांपासून वंचीत
पेन्शन, ग्रॅच्युइटी, न घेतलेल्या शिल्लक रजेचा पगार.
निवृत्ती आणि सेवेच्या कालावधीत सहावा आणि सातवा वेतन आयोगाचा लाभ, थकीत भत्ते.