मुंबई : पुर्नविकासात चांगले घर मिळेल म्हणून पै पै जमा करून विकासकाला दिले. इमारतीचे काम पूर्ण झाले मात्र ताबा मिळाला नाही. म्हणून न्यायालयात धाव घेतली. निवृत्त झाल्याने घरभाडे, संसार चालवयाचा कसा म्हणून कुटुंबासह घराचा ताबा घेण्यासाठी सोसायटीत गेले. मात्र, घरात प्रवेश करण्यापूर्वीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
मन सुन्न करणारी ही घटना मुलुंडच्या नानेपाडा येथील ओमकार को. ऑप हौसिंग सोसायटीत नुकतीच घडली. यशवंत शेंगाळ असे मृत्यू झालेल्या सदनिकाधारकचे नाव आहे. माझ्या पतीच्या मृत्यूला विकासकच जबाबदार आहेत, असा आरोप त्यांच्या पत्नी संगीता शेंगाळ यांनी केला आहे.
ओमकार को. ऑप हौसिंग सोसायटीच्या पुर्नविकसाचे काम सोसायटीकडून गुरुमाऊली डेव्हलपरचे जगदीश राजे व दिलीप कुडाळकर यांना दिले होते. 2010 मध्ये यासाठी करारनामा झाला होता आणि 2013 मध्ये घराचा ताबा मिळणार होता. 2023 मध्ये इमारत उभी राहिली. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर विकासकाने यशवंत शेंगाळ यांच्यासह 25 जणांना घराचा ताबा मिळाला नव्हता. त्यामुळे हे सर्व जण न्यायालयात गेले होते. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. शेंगाळ हे मुख्य सोसायटीचे प्रवर्तक आणि अध्यक्ष होते.
या लढाईमुळे ते अस्वस्थ होते. हातातील पैसा संपला. त्यात दोन महिन्यापूर्वी निवृत्त झाले होते. रस्त्यावर येण्याची वेळ आल्याने शेंगाळ हे कुटुंबासह सोसायटीत घराचा ताबा घेण्यासाठी गेले असता तेथे कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला आहे. आम्ही फक्त हक्काचे घर मागत होतो. मात्र, पैशांअभावी आमचा आवाज दाबला जात असल्याचे सोसायटीचे सदस्य मनोहर वायळ यांनी सांगितले.
निवृत्तीनंतर राहायचे कुठे? पुढे कसे होणार? या विचाराने शेंगाळ अस्वस्थ होते. आंम्ही हक्काच्या घरात जाण्यापूर्वीच त्यांनी आमच्या डोळ्यादेखत प्राण सोडले. संबंधित कंत्राटदार विकासक माझ्या पतीच्या मृत्यूला जबाबदार आहेत.
संगीता शेंगाळ, मृत यशवंत यांच्या पत्नी