

मुंबई : कांदिवलीतील कन्स्ट्रक्शन साईटवर पत्नीची हत्या करून पळून गेलेल्या आरोपी पतीला चारकोप पोलिसांनी अटक केली. दसा बैलोचन राणा असे या पतीचे नाव असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. गावी जाण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून त्याने पत्नी हिमेंद्री दसा राणा हिची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
कांदिवलीतील चारकोप, सेक्टर तीन, चारकोप डेपोजवळील रामविजय नावाच्या एका सहकारी सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. तिथेच काही कामगार कामाला आहेत. दिवसा काम करून ते सर्वजण तिथेच झोपतात. याच साईटवर हिमेंद्री आणि तिचा पती दसा राणा हे एक वर्षांपासून कामाला होते.20 सप्टेंबरला रात्री दारुच्या नशेत आलेल्या दसाने त्याच्या पत्नीकडे गावी जाण्यासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र तिच्याकडे पैसे नसल्याने तिने त्याला पैसे देण्यास नकार दिला. याच कारणावरुन त्यांच्यात प्रचंड वाद झाला. रागाच्या भरात त्याने हिमेंद्रीची गळा आवळून हत्या केली.
हा संपूर्ण प्रकार त्यांच्या मुलासमोर घडला. ही माहिती इतर कामगारांकडून समजताच चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या हिमेंद्रीला पोलिसांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या मुलाने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर बांधकाम साईटचा मुकादम लालप्पा गुंडीवाला याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दसा राणा याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. हत्येनंतर तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली.शोधमोहीम सुरू असताना दुसर्या दिवशी दसा याला पोलिसांनी अटक केली.