

मुंबई: अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई केली आहे.
१४ जुलै ते १७ ऑगस्टदरम्यान राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत मुंबईतील सहा हॉटेल, क्लब आणि खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये वांद्रे येथील प्रसिद्ध ओटर्स क्लबचाही समावेश आहे.
ओटर्स क्लबमध्ये ‘रेग्युलर पनीर’च्या नावाखाली ॲनालॉग पनीरचा वापर करून पदार्थ तयार केल्याचे एफडीएच्या तपासणीत आढळले. ओटर्स क्लबच्या तपासणीदरम्यान फरशी अस्वच्छ व काही ठिकाणी तुटलेल्या, ड्रेनमध्ये अडथळा, रेफ्रिजरेटरचे गॅस्केट खराब आणि तापमान नियंत्रणात त्रुटी आढळल्या.
दहिसरच्या बेकरीत मुदतबाह्य रंग
दहिसर येथील ‘डेली फ्रेश बेकर्स अँड केक्स’मध्येही गंभीर त्रुटी आढळल्या. केक तयार करण्याचे काम थेट ओट्याच्या फरशीवर केले जात होते. बेकरीत झुरळे, माश्या आणि मुंग्यांचा प्रादुर्भाव होता.
केकसाठी मुदतबाह्य खाद्यरंग वापरल्याचे आढळले. विशेष म्हणजे आस्थापनाकडे केवळ किरकोळ विक्रीची नोंदणी असताना प्रत्यक्षात केक उत्पादन सुरू होते. ओव्हनच्या आतील भागात काळपटपणा, अन्नाचे अवशेष आणि गंज, तर बेकिंग ट्रे व भांडी अस्वच्छ अवस्थेत आढळली. कर्मचाऱ्यांकडून हातमोजे आणि ॲप्रनचा वापरही केला जात नव्हता. आवश्यक वैद्यकीय, पाणी व खाद्यपदार्थ चाचणी अहवालांसह फॉस्टॅक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्रही उपलब्ध नव्हते.
खारमधील रेस्टॉरंटवरही कारवाई
खार पश्चिम येथील ‘प्रिन्स ऑफ वेल्स रेस्टॉरंट’मध्ये अन्न गरम-थंड ठेवण्यासाठी पुरेशी तापमान नियंत्रण व्यवस्था नव्हती. अन्न व पॅकेजिंग साहित्याची साठवणूक योग्य पद्धतीने होत नव्हती. उपकरणे व कंटेनर स्वच्छ आणि अन्नसंपर्कासाठी सुरक्षित नसल्याचे आढळले. भिंती, छत व दरवाजांवरील प्लास्टर निघालेले होते.
विलेपार्लेत तेलाच्या पाकिटांवर उंदरे
विलेपार्ले पूर्व येथील ‘राज ऑइल ट्रेडिंग’मध्ये खराब व मुदतबाह्य मालाची योग्य विल्हेवाट लावली जात नव्हती. अन्न व बिगर-अन्न पदार्थ एकत्र ठेवले जात होते. काही तेलाच्या पाकिटांवर उंदराने कुरतडल्याच्या खुणा आढळल्या. साठवणूक विभागातून दुर्गंधी येत होती. तापमान व आर्द्रता नियंत्रणाचे निकषही पाळले जात नसल्याचेही आढळले.
मरोळच्या कॅफेतही स्वच्छतेचा बोजवारा
मरोळ येथील ‘कॅफे सिफारिश’मध्ये अन्न, पॅकेजिंग साहित्य, रसायने आणि वैयक्तिक वस्तूंची स्वतंत्र साठवणूक नव्हती. उपकरणे गंजरोधक व सहज स्वच्छ करता येण्यासारखी नसल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांसाठी हात धुणे, स्वच्छतागृह आणि कपडे बदलण्याच्या सुविधाही अपुऱ्या होत्या. सुधारणा नोटीस देऊनही अहवाल सादर केला नाही.
चेंबूरच्या झेप्टो केंद्रात तापमानाचा घोळ
चेंबूर येथील ‘झेप्टो लिमिटेड’च्या खाद्यसाठवणूक केंद्रातही अन्नसुरक्षेचे गंभीर उल्लंघन आढळले. नॉन-व्हेज चिल्ड खाद्यपदार्थांसाठी तापमान ५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असणे अपेक्षित असताना ते ९ अंश होते. फ्रोझन खाद्यपदार्थांसाठी आवश्यक उणे १८ अंशांऐवजी उणे ११ अंश तापमान आढळले.
कमी वायुवीजन, अपुरा प्रकाश, भिंती व छतावरील खराब पृष्ठभाग, तेलामुळे निसरडी झालेली फरशी, काळ्या धुळीने माखलेले एक्झॉस्ट फॅन आणि किडींच्या प्रादुर्भावास पोषक परिस्थिती आढळली. पिण्याच्या पाण्याचा चाचणी अहवाल उपलब्ध नव्हता. कोल्ड आणि फ्रोझन रूममध्ये अस्वच्छता, तापमान नोंदींचा अभाव आणि तेलगळतीही आढळली.