

मुंबई: सणासुदीच्या काळात तूप, मिठाई व अन्य खाद्यपदार्थांची मागणी वाढत असतानाच मुंबईत भेसळीचा प्रकार उघडकीस आला आहे. मालाड पूर्वेतील मे. गुरुकृपा डेअरी प्रॉडक्ट्स या डेअरीत रिफाइंड सनफ्लॉवर तेल, वनस्पती तूप ब्रँडेड तूप एकत्र करून भेसळयुक्त तूप तयार केले जात होते. त्यानंतर हे तूप ‘पूजा तूप’ या नावाने विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत समोर आले.
मालाडच्या मे. गुरुकृपा डेअरी प्रॉडक्ट्समध्ये उंदीर व झुरळांचा प्रादुर्भावही आढळला. प्रशासनाने कारवाई करत सुमारे १५लाख १५,५९७ रुपयांचा साठा व यंत्रसामग्री जप्त केली असून आस्थापनेचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे.
कारवाईत २,४६४.०५ किलो तूप, रिफाइंड सनफ्लावर तेल व वनस्पती तूप जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत १३ लाख ५५, ५९७ रुपये आहे. त्याचबरोबर तूप तयार करण्यासाठी वापरली जाणारी दोन बॉयलर मशीन व एक खवा मशीनही जप्त करण्यात आले.
या यंत्रसामग्रीची किंमत १ लाख ६० हजार रुपये आहे. साठा आणि यंत्रसामग्री मिळून जप्त मुद्देमालाची किंमत १५ लाख १५,५९७ रुपये असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
परवान्याविना अंधेरीतील सीख कॉर्नरचा व्यवसाय
वर्सोवा-यारी रोड, अंधेरी पश्चिम येथील मे. गुफरान सीख कॉर्नरवरही एफडीएने कारवाई केली. ही आस्थापना वैध अन्न परवाना किंवा नोंदणीशिवाय सुरू असल्याचे तपासणीत आढळले.
तसेच पिण्याच्या पाण्याची तपासणी, अन्नपदार्थांची योग्य साठवणूक व वर्गीकरण, उपकरणे व परिसराची स्वच्छता, कीड नियंत्रण आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वैद्यकीय तपासणीच्या नोंदी यासंदर्भातील अनेक नियमांचे उल्लंघन आढळले.
त्यामुळे आस्थापनेचा व्यवसाय बंद करून वैध परवाना किंवा नोंदणी मिळेपर्यंत व सर्व त्रुटींची पूर्तता होईपर्यंत व्यवसाय सुरू न करण्याचे आदेश देण्यात आले.
गॅलॉप्स रेस्टॉरंटच्या फ्रीजमधील बर्फावर रक्ताचे डाग
महालक्ष्मी रेसकोर्समधील मे. बीजेआरएस (गॅलॉप्स) रेस्टॉरंटच्या तपासणीतही गंभीर स्वच्छताविषयक त्रुटी आढळल्या. फ्रीजमधील बर्फावर मांसाहारी पदार्थांचे रक्त व केचअपचे डाग आढळले. कच्च्या मालाचे पॅकिंग फाटलेले व खराब होते.
स्वयंपाकघरात ग्रीस साचलेले होते. भिंतींची झीज, ड्रेनेजची समस्या, झुरळांच्या सापळ्यांची अपुरी झाकणव्यवस्था, जिवंत झुरळे आणि मुंग्यांचा वावर तसेच पाणी साचल्याचेही निदर्शनास आले. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी व लसीकरणाच्या नोंदी उपलब्ध नसल्याचेही आढळले.