

मुंबई: बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून त्यांची विक्री करणाऱ्या दानिश खान आणि रुकसाना यांना मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-२च्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या २ हजार १२८ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून, त्यांची किंमत १० लाख ६४ हजार रुपये आहे. याबाबतची माहिती मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुन्हे शाखेच्या कक्ष-२ला ६ सप्टेंबर रोजी मेट्रो सिनेमा नाका, वासुदेव बळवंत फडके चौक परिसरात एक महिला आणि एक व्यक्ती बनावट नोटा विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
पोलिसांनी सापळा रचून रुकसानाला ताब्यात घेतले. तिच्याकडून ५०० रुपयांच्या २७० बनावट नोटा जप्त केल्या. चौकशीत या नोटा दानिश खान याच्याकडून मिळाल्याची माहिती समोर आली.
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कुर्ला रेल्वे स्थानकाजवळून दानिश खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या १ हजार ८५८ बनावट नोटा जप्त केल्या. आरोपी बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या कक्ष-२कडून सुरू आहे. आझाद मैदान पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ मधील कलम १७८, १८०, ६१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.