

प्रकाश साबळे
मुंबई: मुंबई महानगरपालिकेची सध्या मान्सूनपूर्व नालेसफाई सुरू आहे. मात्र या नालेसफाईत कंत्राटदारांकडून कामगारांना चक्क दारू पाजून नाल्यात उतरविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार कुर्ला एल.वाॅर्डातील परिसरात उघडकीस आला. परिणामी पालिकेच्या नालेसफाई कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.
याआगोदर नालेसफाईत कंत्राटदारांची हात सफाई पाहिली, मात्र आता दारूड्या कामगारांकडून नालेसफाई करण्यात येत आहे. कुर्ला पश्चिमेकडील गौरीशंकर नाला सफाईदरम्यान नाक्यावरील दारूडे, गर्दुल्ले अशा कामगारांना नाल्यात उतरून सफाईचे काम करून घेतले जात असल्याचे दिसून आले.
दारू प्यालेल्या कामगारांना नाल्यात उतरून त्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम कंत्राटदाराकडून करण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. याविरोधात आवाज उठवीत सदर कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली.
पालिकेच्या एल वार्ड, एम.पूर्व, एम.पश्चिम विभागात मोठे आणि लहान नाल्यांची सफाई झाली नसल्याच्या तक्रारी सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी पक्षांतील नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात आणि स्थायी समितीत केल्या होत्या. यामुळे पालिका प्रशासनाने आता येथील नाला सफाईसाठी कंत्राटदार नियुक्त केला आहे.
मात्र या कंत्राटदारांकडून अशाप्रकारे दारुड्या कामगारांचा वापर केला जात असेल, तर नाले सफाई कशी होईल, असा सवाल काॅंग्रेस पक्षाचे गटनेते अशरफ आझमी यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली आहे. कुर्ला एल वाॅर्डात मोठ्या प्रमाणात झोडपट्टी आहे. यामुळे याठिकाणी कचऱ्याचे साम्राज्यही तेवढेच भयंकर आहे.
कंत्राटदाराकडून नालेसफाई करणाऱ्या कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य न देता थेट नाल्यात उतरवले जात आहे. इतकेच नव्हे तर काही कामगारांना देशी दारूच्या बाटल्या वाटप करून काम करून घेतले जात आहे.
नालेसफाईसाठी आणलेल्या कामगारांना ना गमबूट, ना हेल्मेट, ना हातमोजे आणि ना सेफ्टी जॅकेटसारख्या मूलभूत सुरक्षा साधने पुरविली नाहीत, त्यामुळे कामगारांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. याविषयी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
पिशवीत देशी दारूच्या बाटल्या
येथील नाल्यालगत बसलेल्या एका महिलेने पिशवीमध्ये १० ते १५ देशी दारूच्या बाटल्या आणल्या होत्या. ती या कामगारांना देत असल्याचा व्हिडीओ दै.पुढारी प्रतिनिधीच्या हाती लागला आहे. या देशी दारू पित कामगार नालेसफाईत करत होते, अशाप्रकारे दिवसभर हा प्रकार सुरू होता, मात्र सफाईदरम्यान ना पालिकेचे अधिकारी आले, नाही कंत्राटदार आला. परिणामी दिवसभर दारुड्यांचा हा धिंगाणा सुरू होता.