

मुंबई: वेळेआधी नालेसफाईची कामे हाती घेण्याचे महापालिकेचे निजोजन पुरते फसले आहे. महिनाभर उशिरा कामे सुरू करण्यात आली असून आता कामांची लगीनघाई सुरू झाली आहे. आतापर्यंत 15 टक्केपर्यंत कामे झाली असून 15 मेपर्यंत 80 टक्केपेक्षा जास्त नालेसफाई करण्याचे टार्गेट कंत्राटदारांना देण्यात आले आहे.
मुंबईतील नालेसफाई मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणे अपेक्षित असते. परंतु यावेळी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यास विलंब झाल्यामुळे कामे लांबणीवर पडली. आता सर्व उपनगरांतील सर्वच नाल्यांतील गाळ उपसण्याचे काम सुरू झाली आहेत. साधारणत: 12 ते 15 टक्के नालेसफाई झाली आहे.
यावेळी सुमारे दहा लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त गाळ उपसण्यात येणार आहे. यात मोठ्या नाल्यांसह छोटे नाले व मिठी नदीतील गाळाचा समावेश आहे. नालेसफाईचे दिलेले टार्गेट ठरलेल्या वेळेत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. कामचुकार कंत्राटदाराला चाप लावण्यासाठी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नालेसफाईची कामे पूर्ण झाल्यानंतर नाल्यातील पाण्यावर तरंगणारा कचराही काढावा लागणार आहे. नाल्याबाहेर काढलेला कचरा सुकल्यानंतर तो तातडीने उचलण्याचे निर्देश.
नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवता यावे, यासाठी ‘वॉर रुम’ स्थापन करण्यात आला आहे. कंत्राटामध्ये यंदा अधिक सक्त अटी व शर्तींचा समावेश करण्यात येणार आहे. नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांसाठी प्रशासनाने छायाचित्रणासह 30 सेकंदाचे चित्रीकरण बंधनकारक केले जाणार आहे.