

मुंबई: स्थायी समितीला मिळालेल्या 800 कोटींच्या निधी वाटपाचे सूत्र अखेर ठरले आहे. यात शिवसेना (उबाठा) व काँग्रेस नगरसेवकांची प्रत्येकी अवघे 25 लाख रुपयांचा विकास निधी देऊन बोळवण केली आहे. तर सत्ताधारी भाजपा व शिवसेना नगरसेवकांना मात्र प्रत्येकी सव्वादोन कोटींचा निधी देण्यात आला आहे. पक्षांचे गटनेते यांना दोन ते सव्वादोन कोटींचा निधी देऊन त्यांची तोंडे गप्प केली आहेत.
नगरसेवकांना प्रभागातील विकास कामे करण्यासाठी व सत्ताधाऱ्यांना अपेक्षित कामांसाठी पालिका प्रशासनाने विविध कामांसाठी तरतूद केलेल्या निधीतून 800 कोटी रुपये निधी बाजूला काढून तो निधी स्थायी समितीला दिला होता. या निधीतून प्रत्येक नगरसेवकाला किमान एक कोटींचा विकास निधी मिळेल असे वाटत होते. मात्र वाटप करताना मोठा दुजाभाव करण्यात आला आहे.
सत्ताधारी भाजपा-शिवसेनेने विरोधकांना 25 लाख रुपये विकास निधी देऊन, त्यांची बोळवण केली आहे. त्यामुळे विकास कामे करायची कशी असा प्रश्न त्यांना पडला आहे. महायुतील राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांना दोन ते तीन कोटी रुपये विकास निधी देण्यात आला आहे. समाजवादी पार्टीचाही बाहेरून पाठिंबा असल्यामुळे त्यांनाही दोन कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व एमआयएमच्या नगरसेवकांना मात्र गटनेता वगळता 25 लाख रुपये निधी देऊन, बोळवण केली आहे.
सत्ताधारी गटनेत्यांनी घेतला सर्वाधिक निधी
भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सभागृह नेते गणेश खणकर यांनी आपल्या प्रभागाच्या विकासासाठी तब्बल 20 कोटी रुपयांचा निधी घेतला आहे. तर शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी 10 कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे.
स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मात्र आपल्या प्रभागासाठी अन्य नगरसेवकांप्रमाणे सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी घेतला आहे. महापौर रितू तावडे यांनाही त्यांच्या प्रभागाच्या विकासासाठी सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
अन्य विकास कामांसाठीही निधीची तरतूद
भाजपा -शिवसेना महायुतीने सुचवलेल्या अन्य विकास कामांसाठीही 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद केली आहे. यात प्रत्येक विभागात सौंदर्यीकरणासह पाण्याचे कारंजे उभारण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयानुसार एक कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
प्रमुख नगरसेवकांना मिळालेला निधी
राजेश्री शिरवडकर : 10 कोटी, भाजपा
विशाखा राऊत : 25 लाख, शिवसेना ठाकरे
आश्रफ आजमी : 2 कोटी, काँग्रेस
आशा काळे : 25 लाख, काँग्रेस
किशोरी पेडणेकर : 2 कोटी, शिवसेना ठाकरे
यशवंत किल्लेदार : 2 कोटी, मनसे
विजय उबाळे : 2 कोटी, एमआयएम
डॉ सईदा खान : 3 कोटी, राष्ट्रवादी काँग्रेस
गणेश खणकर : 20 कोटी, भाजपा
अमय घोले : 10 कोटी, शिवसेना
प्रभाकर शिंदे : 2 कोटी 50 लाख, भाजपा
अजित रावराणे : 2 कोटी 25 लाख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार
रितू तावडे : 2 कोटी 25 लाख.