

Mumbai Crime
मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेकडील परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका दहा वर्षांच्या मुलीवर तरुणाने अत्याचार करून तिच्या गुप्तांगात टोकदार स्क्रूड्रायव्हर घुसवल्याचा प्रकार घडला. कहर म्हणजे घटना घडत असतानाचा आरोपीने व्हिडिओ रेकॉर्डदेखील केला. या घटनेने मुंबई एकदा पुन्हा हादरली आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी २४ वर्षीय आरोपी आणि त्याच्या प्रेयसी (पीडित मुलीची आई) विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पूर्वेतील पीडित मुलीच्या आईचा प्रियकर असलेल्या २४ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि तिच्या गुप्तांगात टोकदार स्क्रूड्रायव्हर घुसवला. यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलीची आई एका केटरिंग सर्व्हिस फर्ममध्ये काम करते. तिचा प्रियकर तिच्या हाताखाली काम करतो. दोघेही एकाच चाळीत राहतात. १४ आणि १५ जून दरम्यान, पीडितेची आई कामावर गेली असताना, आरोपीने मुलीवर चारवेळा अत्याचार केला. यादरम्यान, त्याने पीडितेच्या गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर घुसवला आणि या कृत्याचा व्हिडिओ शूट केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेवर धारदार वस्तूने हल्ला केला आणि याची कुठे वाच्यता केल्यास व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली. पण, मुलीने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला आणि तिला पोलिसात तक्रार दाखल करण्यास सांगितले.
या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ६४(२)(i), ११५, ३५२, आणि ३५१(३) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६, ८, आणि १२ आणि आयटी कायद्याच्या कलम ६६ ई आणि ६७ बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.