

मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे बांधण्यात येणाऱ्या ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह बोगद्याच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. आता हा बोगदा वानखेडे स्टेडियम येथे न संपता गिरगाव चौपाटीजवळ मफतलाल जलतरण तलाव येथे संपेल.
ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह या 9 हजार कोटींच्या प्रकल्पाला महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे मंजुरी देण्यात आली होती; मात्र आता या प्रकल्पाचा सुधारित आराखडा प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.
जुन्या आराखड्यानुसार बोगदा बांधल्यास तो वानखेडे स्टेडियम येथे संपेल. परिणामी, मरिन ड्राइव्ह येथील क्वीन्स नेकलेस या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होईल. बांधकामादरम्यान मरिन ड्राइव्ह येथे होणारी वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण यांमुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या या परिसरातील वातावरण खराब होऊ शकते.
हे टाळण्यासाठी बोगदा प्रकल्पाच्या संरेखनात बदल करण्याची मागणी मरिन ड्राइव्ह सिटीझन्स असोसिएशनने केली आहे. पूर्वमुक्त मार्ग आणि अटल सेतू यांच्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ऑरेंज गेट बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामुळे 45 मिनिटांचा प्रवास 5 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. तसेच पूर्व-पश्चिम दळणवळण सुलभ होईल.