

श्रीकांत जाधव
मुंबई: मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर गेल्या अडीच वर्षांत विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल १२,७४९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणांमधून ४६ लाख १० हजार रुपयांचा तडजोड दंड वसूल केला गेला आहे. मात्र गुन्ह्यांची आकडेवारी पाहता कोस्टल रोडवर वेग मर्यादा आणि वाहतूक नियम फक्त कागदावरच असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीनंतर मुंबई आरटीओने अशा बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई हाती घेतली आहे. मात्र, अजूनही प्रलंबित असलेले हजारो गुन्हे लवकर मार्गी काढणे हे मुंबई आरटीओसमोर एक आव्हान आहे.
मुंबईतील महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या सुरक्षेच्या आणि नियमांच्या अंमलबजावणी प्रकरणांत कमालीचे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या तीन वर्षांत ( २०२४, २०२५ आणि २०२६ ऑगस्टपर्यंत) या दरम्यान एकूण १२,७४९ गुन्हे दाखल झाले आहेत.
त्यापैकी केवळ २,३१५ गुन्हे निकाली काढण्यात यंत्रणेला यश आले आहे. म्हणजेच तब्बल १०,४३४ गुन्हे अजूनही प्रलंबित आहेत. निकाली काढण्याचा हा दर केवळ १८.१६ टक्के इतका संथ आहे.
२०२४ मध्ये १२४० गुन्हे
कोस्टल रोडच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच २०२४ मध्ये १,२४० गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यापैकी फक्त ३५० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तर ७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
२०२५ मध्ये सर्वाधिक गुन्हे
गेल्या वर्षी २०२५ मध्ये कोस्टल रोडच्या कारवाईचा वेग प्रचंड वाढलेला दिसतो. या एकाच वर्षात तब्बल ८,७५४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ज्यातून प्रशासनाने ३७ लाख ६६ हजार रुपयांचा विक्रमी दंड वसूल केला आहे. मात्र या वर्षात ही केवळ १,८९३ प्रकरणे बंद करण्यात आरटीओला यश आले आहे.
चालू वर्षात नवीन २,७५५ नवीन गुन्हे
वर्षभरात आरटीओकडून जानेवारी ते ऑगस्ट महिन्यापर्यंत २,७५५ नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आणि फक्त ७२ प्रकरणे बंद झाली आहेत. शिवाय १ लाख ४४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आरटीओकडून बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई हाती घेतली आहे. कोस्टल रोडवर सुद्धा कारवाईचा वेग वाढला आहे. प्रलंबित प्रकरणे लवकरच मार्गी लागणार आहे.
- निखिल साळुंखे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ताडदेव