

मुंबई : विकास प्रकल्पांच्या नावाखाली होणार्या वृक्षतोडीवर तीव्र टीका होत असतानाच, आता 26.5 किमी लांबीच्या मुंबई कोस्टल रोड प्रकल्पासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने परिसरातील एकूण 60 हजार खारफुटीच्या झाडांपैकी 45 हजार झाडांची ओळख निश्चित केली आहे. यापैकी 9 हजार खारफुटीची झाडे पूर्णपणे तोडली जाणार असून, उर्वरित 36 हजार झाडे राज्यातील विविध भागांत स्थलांतरित केली जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
मुंबईसारख्या किनारपट्टीच्या शहरासाठी खारफुटीची जंगले अत्यंत महत्त्वाची आहेत. किनारपट्टीची धूप रोखणे, भरती-ओहोटीमुळे होणारे पूर आणि वादळी लाटांपासून संरक्षण देण्यात खारफुटीची निर्णायक भूमिका असते. त्यांच्या दाट मुळांमुळे माती स्थिर राहते आणि समुद्राच्या लाटांचा वेग कमी होतो. मात्र 20 हजार कोटी रुपयांच्या कोस्टल रोड प्रकल्पासाठी 9 हजार झाडांची कत्तल करण्यात येणार आहे.
पालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी उच्च न्यायालयाची परवानगी मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर उत्खननाचे काम सुरू केले जाणार आहे. मात्र, हे काम खारफुटी क्षेत्रात येत असल्याने राज्य वन विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) घेणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सुरू असून, या महिन्याअखेरीस परवानगी मिळण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष काम सुरू होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. सदर कोस्टल रोड हा मुंबईतील उत्तर - दक्षिण प्रवासाचे चित्र बदलणारा ठरणार आहे. मरीन ड्राइव्ह आणि वरळी दरम्यानचा 10 किलोमीटर लांबीचा किनारी रस्ता एमएमआरला जोडणार आहे. यात बोगदे, पूल आणि उन्नत कॉरिडॉरचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी पालिकेने 2028 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.