

मुंबई : वांद्रे पुनर्विकास प्रकल्पात 800 कोटी रूपये गुंतवणूक घोटाळा प्रकरणी एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविलेले एस विभागातील सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांची अखेर सहाय्यक आयुक्त रुग्णालये विभागात बदली करण्यात आली. तसे कार्यालयीन आदेश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवार, 15 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित केले. तर एस विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून समरिन सलिम सय्यद या एमपीएससी संवर्गातील उमेदवाराची नियुक्ती करण्यात आली.
वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर वांद्रे येथील हाऊसिंग पुनर्विकास प्रकल्पात अनेक आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांना तसेच पालिका अधिकाऱ्यांनाही आकर्षक रकमेच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून 20 ते 50 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप समोर आला आहे.यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी त्यांना 29 नोव्हेंबर 2025 रोजी एक महिना सक्तीच्या रजेवर पाठविले होते. मात्र एक महिना पूर्ण न होता, त्यांची एस विभागातून रुग्णालये विभागात बदली केल्याने पालिका प्रशासनात चर्चेला उधाण आले आहे.