

मुंबई: मुंबईतील कचरा समस्याप्रकरणी उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला फटकारल्यानंतर आता मुंबईतील सर्वाधिक कचरा होणाऱ्या संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवली जाणार असून, बेसुमार कचरा फेकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.
घनकचरा व्यवस्थापन विभागाने केलेल्या नियोजनानुसार मुंबईतील बाजारपेठा, मुख्य रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे आणि भूखंड, समुद्रकिनारे, नाले व इतर जलस्रोतांच्या परिसरांवर यापुढे विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सर्व कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे निगराणी ठेवण्यात येईल.
शाळा, रुग्णालये, रेल्वे, मेट्रो स्थानक, बस स्थानक तसेच बाजारपेठ आदी परिसरांतील पदपथांवरील सर्व प्रकारचे अतिक्रमण तत्काळ हटवून पदपथ सुलभ करावेत. अनधिकृत बांधकामांचे निष्कासन करावे, तसेच अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत अधिकृत करु नयेत.
प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडीस (बॉटलनेक) कारणीभूत बाबींवर उपाययोजना कराव्यात. तसेच, महानगरपालिकेच्या ‘मार्ग’ ॲपवर प्राप्त खड्ड्यांच्या तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करावेत, असेही भिडे यांनी निर्देश दिले.
उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग कचरा प्रक्रिया प्रकल्पातील दुर्गंधी नियंत्रणामध्ये झालेल्या लक्षणीय सुधारणांबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले आहे.
याच अनुषंगाने, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सर्व परिमंडळीय उपायुक्त, सहायक आयुक्त आणि विभागस्तरावर (वॉर्ड) कार्यरत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मुंबईतील दृश्यमान स्वच्छता आणि कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांचे कायमस्वरूपी निर्मूलन यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले.
रिकामे आणि चांगले पदपथ हे चांगल्या शहराचे वैभव असते. मुंबईतील सुमारे ५० टक्के नागरिक आपला दैनंदिन प्रवास चालत करतात. या पार्श्वभूमीवर, शाळा, रुग्णालये, रेल्वे, मेट्रो स्थानक, बस स्थानक तसेच बाजारपेठांच्या परिसरातील प्रमुख रस्त्यांच्या बाजूच्या पदपथांवरील सर्व प्रकारचे अतिक्रमण हटवून पदपथ तत्काळ रिकामे करण्यावर सर्व सहायक आयुक्तांनी भर द्यावा.
पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमण, चुकीचे रॅम्प तत्काळ निष्कासित करावेत आणि पदपथ नागरिकांसाठी चालण्यायोग्य बनवावे, पादचाऱ्यांनी पदपथाचा जास्तीत जास्त वापर केल्यास रस्ते वाहतूक उत्तम होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असेही भिडे यांनी स्पष्ट केले आहे.