

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर २०२१ मध्ये स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्याप्रकरणी तसेच व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने शनिवारी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण दहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले.
विनायक शिंदे, नरेश गोर, रियाझुद्दीन काझी, सुनील माने, आनंद जाधव, सतीश मोथकुरी, मनीष सोनी आणि संतोष शेलार अशी या प्रकरणातील उर्वरित आठ आरोपींची नावे आहेत.
राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी आरोप निश्चित करत खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा केला. आरोप निश्चित झाल्यानंतर सर्व आरोपींनी न्यायालयात स्वतःला निर्दोष असल्याचे सांगत आरोप फेटाळले.
या प्रकरणात आरोपींवर भारतीय दंड संहितेअंतर्गत खून, खंडणी, पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारी कट रचणे यांसारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. याशिवाय बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि स्फोटक पदार्थ कायदा (एक्सप्लोसिव्ह सबस्टन्स ॲक्ट) यांतील संबंधित कलमांखालीही त्यांच्यावर खटला चालविण्यात येणार आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर हे प्रकरण देशभरात चर्चेत आले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाणे येथील खाडीत आढळला होता. या दोन्ही घटनांचा तपास नंतर एनआयएकडे सोपविण्यात आला होता. आरोप निश्चित झाल्यानंतर आता या बहुचर्चित प्रकरणातील नियमित साक्षी-पुरावे आणि सुनावणीला लवकरच सुरुवात होणार आहे.
एनआयएने काय म्हटले आहे?
सचिन वाझे हा या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार
अल्टा माऊंट रोडवर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क केली होती
स्वतःची ‘सुपर कॉप’ अशी जुनी ओळख परत मिळवणे हा वाझेचा हेतू होता
व्यावसायिकहिरेन यांनी स्फोटकांची जबाबदारी स्वतःवर घेण्यास नकार दिला
त्यामुळे कट उघड होण्याची भीती असल्याने सचिन वाझे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मनसुख हिरेन यांची हत्या घडवून आणली
गुन्ह्यानंतर डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर), सीसीटीव्ही फुटेज आणि हिरेन यांचा मोबाईल फोन नष्ट करून पुरावे मिटवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला