

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण व मध्य मुंबईतील चाळकरी सध्या पार्किंग समस्येमुळे त्रस्त आहेत. चाळीच्या बाजूला गल्लीत गाड्या उभ्या केल्यास, त्या गाड्या वाहतूक पोलिसांकडून उचलल्या जातात किंवा नो पार्किंगचे शुल्क आकारण्यात येते. त्यामुळे वाहन असलेल्या हजारो चाळकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे कारवाई रोखण्यासाठी अधिकृत वाहनतळ ओळखपत्र वितरित करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिका सभागृहात सादर करण्यात आला आहे.
मुंबईमध्ये पार्किंगचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. याचा सर्वाधिक त्रास चाळीसह जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात चाळी व जुन्या इमारती असून त्यांना पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक जण चाळीच्या बाजूला म्हणजेच गल्लीमध्ये आपल्या गाड्या उभ्या करतात.
त्यामुळे अशा गल्लींमधील गाड्यांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यामुळे सध्या चाळकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनेकदा गाड्या उचलून नेत असल्यामुळे गाड्या सोडवण्यासाठी वेळही खर्च होत आहे.
चाळकऱ्यांना होणाऱ्या त्रासाची महापालिका प्रशासनाला माहिती व्हावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात भाजप नगरसेविका शितल गंभीर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे प्रस्ताव सादर केला आहे. या ठरावाच्या सूचनेमध्ये प्रत्येक प्रभागात स्थानिक रहिवाशांची वाहने ओळखण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने अधिकृत वाहनतळ ओळखपत्र वितरित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या वाहनतळ ओळखपत्रामध्ये रहिवाशांचे नाव, पत्ता, इमारतीचे नाव, वाहन क्रमांक नमूद करणे बंधनकारक करण्यात यावे, असेही सुचवले आहे. हा ठराव महापालिका सभागृहात बहुमताने मंजूर करून आयुक्तांकडे अंमलबजावणीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे पालिका आयुक्त काय निर्णय घेणार, याकडे चाळकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
रस्त्यावर गाडी उभी करण्यासाठी परवानगी : रस्त्यावर गाडी उभी करण्यासाठी वाहनतळ ओळखपत्र दिल्यानंतर त्या गाडीच्या मालकाकडून ठराविक शुल्क वसूल करण्यात यावे.
पालिकेला उत्पन्न व समस्येवर तोडगा : यातून महापालिकेला उत्पन्न मिळेल व चाळकऱ्यांच्या पार्किंगचा प्रश्न मार्गी लागेल.
रात्रीच्या वेळात सवलत : विशेष म्हणजे रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत सोसायटीच्या १०० मीटर परिसरात ओळखपत्र असलेल्या वाहनांना गाडी उभी करण्याची परवानगी द्यावी.
अनधिकृत वाहनांवर कारवाई : अनधिकृत उभ्या असलेल्या गाड्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.