

मुंबई: चारकोप ते कांदिवली दरम्यान तब्बल १,५७५ कोटी रुपयांचा जलबोगदा उभारण्यात येणार आहे. समुद्राचे गोडे केलेले पाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीपर्यंत वाहून नेण्यासाठी हा बोगदा बांधण्यात येत असून पावसाळ्यानंतर या कामाचा शुभारंभ होणार आहे.
मनोरी येथे समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. भविष्यात या प्रकल्पातून अजून २०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.
गोडे केलेले पाणी मनोरी येथील पंपिंग स्टेशन केंद्रापासून मनपाच्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये मिसळण्यासाठी मनोरी ते महापालिका उद्यान चारकोप व पुढे महावीरनगर, कांदिवली दरम्यान जलबोगदा बांधण्यात येणार
आहे. सुमारे ७ किमी लांबी व ३.२ मीटर व्यासाच्या बोगद्याचे काम करण्यात येणार आहे. हा बोगदा गोराई खाडीच्या खालून जाणार आहे.
बोगद्यासाठी लागणार चार वर्षांचा कालावधी
बोगद्याचे बांधकाम करण्यासाठी सुमारे चार वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे बोगद्याचे काम ऑक्टोबर २०३० पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतरच समुद्राचे गोडे केलेले पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. या वाढीव पाणीपुरवठ्यामुळे मुंबईतील विशेषत: उपनगरातील पाणीटंचाई काही प्रमाणात दूर होईल, असा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे.
पावसावर अवलंबून राहावे लागणार नाही
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ठाणे जिल्ह्यात असून ही तलाव पाण्याने भरण्यासाठी पावसावर अवलंबून राहावे लागते. एखाद्या वर्षी कमी पाऊस झाला तर मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढावते. मात्र समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यासाठी पावसावर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवणार नाही.