पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील BMW हिट अँड रन प्रकरणातील मुख्य संशयित मिहीर शाह सध्या फरार आहे आणि मुंबई पोलिसांची सहा पथके मिहिरच्या मागावर आहेत. दरम्यान हा अपघात होण्यापूर्वी मिहीर आणि त्यांचे चार मित्र एका पबमध्ये गेले होते.
मिहीर हा शिवसेना (शिंदे) नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. या अपघात पोलिसांनी राजेश शहा यांना अटक केली होती, त्यांना या प्रकरणी सोमवारी जामीन मिळाला. तर दुसरीकडे मिहीर अजून बेपत्ता असून पोलिसा त्याच्या मागावर आहेत, तसेच त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आलेली आहे.
अपघातापूर्वी रात्री ११ वाजून ८ मिनिटांनी मिहीर आणि त्याचे चार मित्र पबमध्ये गेले. तेथे त्यांनी जेवण केले आणि दारू प्यायली. पण मिहीरने दारू घेतलेली नव्हती, तो फक्त रेड बूल हे एनर्जी ड्रिंक प्यायला असा दावा पबच्या चालकाने केला आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने काही वृत्तवाहिन्यांच्या हवाल्याने दिली आहे.
अपघात रविवारी रात्री झाला होता. यामध्ये प्रदीप नखवा आणि त्यांच्या पत्नी कावेरी दुचाकीवर जात असताना मिहीरच्या कारने त्यांना उडवली होती. यात कावेरी यांना जवळपास दीड किलोमीटर फरपटत नेले होते, त्यात त्यांचा मृत्यू झाला. मिहीर दारू पिऊन गाडी चालवत होता, असा संशय आहे.