

मुंबई : मे महिन्यातच सुरू होणाऱ्या पावसामुळे मुंबई महापालिकेने जानेवारीअखेरपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एप्रिलअखेरपर्यंत नालेसफाई पूर्ण होऊन यंदाच्या पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळेल, असा दावाही महापालिकेकडून केला जात आहे.
मुंबईत 2025 मध्ये मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्यामुळे नालेसफाईची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. अनेक नाल्यांमधून 50 टक्केही गाळ उपसण्यात आला नाही. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरात ठिकठिकाणी पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत झाले होते. यावेळी मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. यासाठी मुंबई महापालिकेने यंदा नालेसफाईचे काम वेळेत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी अखेरपर्यंत नालेसफाईचे काम सुरू करून एप्रिलपर्यंत 90 टक्के काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मे महिन्यात पाऊस सुरू झाला, तरी नालेसफाई अपूर्ण राहिली म्हणून पाणी तुंबण्याचा प्रश्न उद्भवणार नसल्याचे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
नालेसफाईच्या कामात कंत्राटदारांकडून होणारा चालढकलपणा लक्षात घेऊन, महापालिकेने विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवता यावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे मुख्यालयात ‘वॉर रुम’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटामध्ये यंदा अधिक सक्त अटी व शर्तींचा समावेश करण्यात येणार आहे. नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांसाठी छायाचित्रणासह 30 सेकंदांचे चित्रीकरण प्रशासनाकडून बंधनकारक केले जाणार आहे. तर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण करणे अनिवार्य करण्यात येणार असल्याचे पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून सांगण्यात आले.