

मुंबई : मुंबई महापालिका रुग्णालयांत व कार्यालयांमध्ये आता रोख रक्कम स्वीकारली जाणार नाहीत. केस पेपर काढणे, तपासणी शुल्क, विविध सेवा शुल्क व बिल भरण्यासाठी डिजिटल पेमेंटच करावे लागणार आहे. भारत सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या वित्त विभागाने यासाठी ‘डिजिटल पेमेंट कलेक्शन सेवा प्रणाली’ उभारण्यासाठी निविदा जारी केली असून निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2026 आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या सर्व रुग्णालये व कार्यालयांमध्ये टप्प्याटप्प्याने डिजिटल पेमेंट सुविधा लागू केली जाणार असल्याचे वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेने यापूर्वी 2019 मध्ये डिजिटल पेमेंट योजना राबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तांत्रिक अडचणी व प्रशासकीय कारणांमुळे ही योजना बारगळली गेली होती. आता नव्याने ही योजना प्रभावीपणे राबवली जाणार आहे.
रोख पैशांमुळे होणारे वाद थांबणार
आतापर्यंत रोख व्यवहारांमुळे बदली नसणे, लांब रांगा, वारंवार काउंटरवर फेऱ्या आणि कर्मचाऱ्यांशी वाद अशी परिस्थिती निर्माण होत होती. तसेच रोख व्यवहारांमधील पारदर्शकतेवरही नागरिकांकडून वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.
युपीआय, कार्ड, क्यूआर कोडद्वारे आधारित पेमेंट सुविधा
निविदेद्वारे निवडण्यात येणारी एजन्सी युपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड व क्युआर कोड-आधारित पेमेंट सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यामुळे रुग्ण व नागरिकांना रोख रक्कम बाळगण्याची गरज राहणार नाही. तसेच सर्व व्यवहारांचे डिजिटल ट्रॅकिंग होणार असल्याने पारदर्शकता वाढणार आहे.