

मुंबई : राज्यातील दोनशे किंवा त्याहून अधिक खाटांची संख्या असलेल्या वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांना आता इन-हाऊस रक्त केंद्रासाठी परवानगी (एनओसी) देण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य रक्त संक्रमण परिषद (एसबीटीसी) व राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवे धोरण लागू करण्यात आले आहे.
या निर्णयानुसार, सरकारी रुग्णालयांना आरोग्य विभागाने ठरवलेल्या गरजेनुसार रक्त केंद्र सुरू करता येणार असून त्यासाठी वेगळी एनओसी आवश्यक राहणार नाही. मात्र खासगी व स्वयंसेवी संस्थांसाठी ठराविक अटी व निकष लागू करण्यात आले आहेत.
क्लस्टरिंग टाळण्यासाठी कडक नियम
एकाच परिसरात जास्त रक्त केंद्रे स्थापन होऊ नयेत, यासाठी क्लस्टरिंग टाळण्यावर भर देण्यात आला आहे. नवीन रक्त केंद्रासाठी अर्ज करणाऱ्या संस्थेला प्राप्तकर्त्या (रिसिव्हिंग) रुग्णालयांसोबत सामंजस्य करार करणे बंधनकारक असेल. महानगरांसाठी दरवर्षी किमान 3 हजार, तर इतर भागांसाठी 2 हजार रक्त युनिट्सची गरज असलेल्या रुग्णालयांशी करार आवश्यक आहे.
स्वयसेवी संस्थांसाठी निकष
एनओसीसाठी अर्ज करणारी संस्था कायदेशीर नोंदणीकृत स्वयंसेवी किंवा धर्मादाय संस्था असणे आवश्यक असून ती किमान दोन वर्षे जुनी असावी.
संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये आरोग्य सेवा किंवा रक्त संक्रमण सेवा संबंधित उपक्रमांचा समावेश असावा. तसेच मागील दोन वर्षांचे लेखापरीक्षित आर्थिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
स्वयंसेवी रक्तदानावर भर
दरवर्षी किमान 2 हजार युनिट्स रक्त संकलन करण्याची हमी देणे आवश्यक असून यामध्ये जवळपास 100 टक्के स्वयंसेवी रक्तदान असणे अपेक्षित आहे. रक्तदान शिबिरे व पूर्व-उत्तर समुपदेशनासाठी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता आणि रक्त केंद्र सल्लागार नियुक्त करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
स्वयंसेवी रक्तदानावर भर
दरवर्षी किमान 2 हजार युनिट्स रक्त संकलन करण्याची हमी देणे आवश्यक असून यामध्ये जवळपास 100 टक्के स्वयंसेवी रक्तदान असणे अपेक्षित आहे. रक्तदान शिबिरे व पूर्व-उत्तर समुपदेशनासाठी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता आणि रक्त केंद्र सल्लागार नियुक्त करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
दोन वर्षांत घटक विभाजन सुविधा
रक्त केंद्राला परवाना मिळाल्यानंतर दोन वर्षांच्या आत रक्त घटक (ब्लड कंपोनंट्स) विभाजन सुविधा सुरू करणे आवश्यक राहणार आहे. तसेच एसबीटीसी /एनबीटीसीकडील सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे व मोफत रक्तसंक्रमण धोरणाचे पालन करण्याचे वचनपत्र संस्थेला द्यावे लागेल.
एनओसी दोन वर्षांसाठी वैध
नवीन रक्त केंद्रासाठी दिलेली एनओसी दोन वर्षांसाठी वैध राहील. दोन वर्षांनंतर प्रत्येक रक्त केंद्राच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. वेळोवेळी तपासणी करण्यात येणार असून गैरप्रकार आढळल्यास एनओसी तात्काळ रद्द केली जाईल.