

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय हालचाल होताना दिसत आहे. ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आगामी निवडणुकीत युती होण्याची शक्यता आहे, असा स्पष्ट संकेत आज (दि.९) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. मात्र, या युतीचा महाविकास आघाडी (मविआ) किंवा इंडिया आघाडीशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत यांनी सांगितले की, महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीपुरती मर्यादित होती, तर इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अद्याप कोणतीही आघाडी ठरलेली नाही. मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता असून, हा निर्णय दोन्ही बंधूंच्या हातात असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. ही युती पूर्णपणे स्थानिक राजकारणाशी संबंधित असून, राष्ट्रीय स्तरावर किंवा इंडिया आघाडीत यावर चर्चा होत नाही.
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसकडून विरोध असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसने शिवसेनेसोबत युतीधर्म तोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राऊत यांनी स्पष्ट केले की, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा केंद्रबिंदू मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान आणि महाराष्ट्राचे रक्षण हाच आहे. शरद पवार आणि काँग्रेसचे राज्यातील प्रमुखही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र असल्याचे त्यांनी नमूद केले.