

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवारी देण्यावरून झालेल्या पक्षांतर्गत संघर्षाचा परिणाम महापालिका राजकारणावर होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत माजी आ. मालोजीराजे, आ. सतेज पाटील यांना साथ देणार की, सवता सुभा मांडणार, असा सवाल उपस्थित होत आहे. महापालिका राजकारणात 10 वर्षे सतेज पाटील यांच्यासोबत असणार्या हसन मुश्रीफ यांची भूमिका बदलत्या राजकारणात महायुतीसोबत आहे. त्यांची साथ सतेज पाटील यांना मिळणार नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील शाहू महाराज यांच्या विजयानंतर महापालिका राजकारणात मालोजीराजे पुन्हा सक्रिय होऊन ते सतेज पाटील यांना साथ देतील, असे वाटत होते; पण उमेदवारीवरून संघर्ष झाल्याने सतेज पाटील महापालिकेच्या राजकारणात एकाकी पडण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात महायुतीचे तिन्ही पक्ष ताकदीने लढणार आहेत. महायुतीचे आव्हान सतेज पाटील यांच्यासमोर राहणार आहे.
2005 मध्ये ताराराणी आघाडीमध्ये आमदार महादेवराव महाडिक, आ. सतेज पाटील आणि आमदार मालोजीराजे हे तिघेही एकत्रित होते. त्यानंतर तत्कालीन आ. मालोजीराजे यांनी ताराराणी आघाडीतून फुटून राष्ट्रवादी जनसुराज्य आघाडीला आपल्या काही नगरसेवकांसमवेत पाठिंबा दिला होता. 2009 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सतेज पाटील आणि महाडिक हे दोन्ही गट वेगळे झाले. या दोन गटांत राजकीय संघर्ष उभा राहिला. 2010 च्या निवडणुकीत सतेज पाटील यांचे काँग्रसेवर एकहाती वर्चस्व होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी करत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या साथीने महापालिकेची सत्ता मिळविली. 2010 ते 2015 या पाच वर्षांत महाडिक गट तसा महापालिका राजकारणात फारसा सक्रिय नव्हता. 2015 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळविली. परंतु, तारारणी आघाडीने अस्तित्व निर्माण करत 19 नगरसेवक निवडून आणले. भाजपच्या 13 नगरसेवकांच्या साथीने त्यांनी विरोधकांची भूमिका पार पाडली.
माजी आ. मालोजीराजे मात्र 2010 पासून महापालिका राजकारणापासून अलिप्त आहेत. त्यांना मानणारे नगरसेवक दोन्ही आघाडीत कार्यरत होते. मे 2024 मध्ये शाहू महाराज काँग्रेसचे खासदार झाले. आता माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांनाही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी दिल्याने महापालिकेच्या राजकारणात पुन्हा मालोजीराजेंची एन्ट्री होईल, असे वाटत असतानाच अचानक मधुरिमाराजे यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेस पक्षात मालोजीराजे यांना मानणार्या नगरसेवकांची त्यामुळे अडचण होण्याची शक्यता आहे. मालोजीराजे यांचा प्रभाव असणार्या प्रभागातील राजकारणही बदलेल. मालोजीराजे यांना मानणारे नगरसेवक किंवा इच्छुक उमेदवारांची कोंडी होण्याची शक्यता आहे.