

Mumbai BMC Election 2025
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेचे आदेश जारी होताच सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वांत श्रीमंत असलेल्या मुंबईच्या महापालिकेवर पुन्हा सत्तेची मांड ठोकण्यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोर्चेबांधणी केली आहे. त्यानुसार मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघातील प्रभागांची पक्षातील 12 उपनेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याकडून महिनाभरात संपूर्ण प्रभागांचा आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत.
मुंबई महापालिकेत गेली 25 वर्षे शिवसेनेची सत्ता होती. परंतु, पक्षफुटीनंतर आणि विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित निकालामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई महापालिकेवर आपले वर्चस्व राखण्यासाठी अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.
महापालिकेच्या 227 प्रभागातील पक्षाची मोर्चेबांधणीसाठी ठाकरेंनी पक्षातील 12 उपनेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. प्रत्येक उपनेत्यांकडे प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघाप्रमाणे मुंबईतील 36 विधानभेतील प्रभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये अमोल कीर्तीकर (दहिसर, बोरिवली, मागाठाणे), उद्धव कदम (चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम), विलास पोतनीस (दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व), विश्वासराव नेरूरकर (वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम), रवींद्र मिर्लेकर (विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम), गुरुनाथ खोत (चांदिवली, कलीना, कुर्ला), नितीन नांदगावकर (विक्रोळी, भांडुप, मुलुंड), सुबोध आचार्य (घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर - मानखुर्द), मनोज जमसूतकर (अनुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा), अरुण दूधवडकर (धारावी, माहीम, वडाळा), अशोक धात्रक (वरळी, दादर, शिवडी), सचिन अहिर (मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी) यांचा समावेश आहे.
विधानसभा मतदारसंघाप्रमाणे या उपनेत्यांकडून प्रभागातील सद्यस्थिती, मराठी-अमराठी मते, प्रभागात कोणते प्रश्न प्रलंबित आहेत, प्रभागनिहाय लोकसंख्या, स्थानिक गरजा आदी गोष्टींचा विचार करून ते आपला अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे सोपविणार आहेत. त्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या अहवालावर चर्चा करून निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे.