मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन आणि भाजपचे ऑपरेशन मनधरणी यामुळे मुंबईतील साधारण 22 बंडखोरांपैकी शुक्रवारी बहुतांश बंडोबांना शांत करण्यात यश आले असून, आता केवळ पाच वॉर्डांत बंडखोरी कायम आहे. वॉर्ड क्रमांक 182 मधून शिवसेनेच्या बंडखोर श्रद्धा पाटील यांनी अर्ज मागे घेतला. भाजपच्या राजन पारकर यांच्याविरुद्ध श्रद्धा पाटील यांनी अर्ज दाखल केला होता, तर वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपच्या बंडखोर वैशाली पगारे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार पूजा कांबळे यांच्या विरोधातील अर्ज मागे घेतला आहे.
वॉर्ड क्रमांक 64 मधून भाजप बंडखोर माया राजपूत यांनी माघार घेतली आहे, तर वॉर्ड क्रमांक 155मधून जयश्री खरात, हर्षा साळवे व शशिकला कांबळे यांची समजूत काढण्यात भाजपला यश आले. वार्ड क्रमांक 200 मधून गजेंद्र धुमाळे यांनी बंडखोरी मागे घेतली. इथे भाजपचे संदीप पानसांडे हे अधिकृत उमेदवार आहेत. भाजपचे अरुण दळवी यांनी वॉर्ड क्रमांक 204 मधून उमेदवारी अर्ज मागे घेतला. वॉर्ड क्रमांक 225 मधून भाजपचे बंडखोर कमलाकर दळवी यांनी अर्ज मागे घेतला. या ठिकाणी हर्षिता नार्वेकर या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत.
यासोबतच, वॉर्ड क्रमांक 224 मधून भाजपचे बंडखोर जनक संघवी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आकाश पुरोहित यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. वॉर्ड क्रमांक 54 मधून भाजपचे बंडखोर संदीप जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. वॉर्ड क्रमांक 60 मधून दिव्या ढोले, 173 मध्ये शिल्पा केळुसकर, 205 मध्ये जान्हवी राणे, 177 मध्ये नेहल शाह आणि 180 मधून जान्हवी पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतलेला नाही.

