

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दाखल अर्जांच्या छाननीत 117 अर्ज बाद झाले असून त्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या तीन उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. तर उबाठा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 956 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. बुधवारी झालेल्या छाननीत 839 अर्ज वैध ठरले. यामध्ये. सर्वाधिक अर्ज घणसोलीत 39 तर नेरुळ मध्ये 28 बाद झाले. आता 2 जानेवारीला किती उमेदवार माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे कोपरखैरणे प्रभाग क्रमांक 13 चे उमेदवार रामदास पवळे यांचा अर्ज सुचक आणि अनुमोदक यांची स्वाक्षरी नसल्याने बाद ठरला. तर सीबीडी-बेलापूर प्रभाग क्रमांक 28 मधील उमेदवार प्रियंका फोंडे तसेच महापे प्रभाग क्रमांक 06 च्या उमेदवार प्रियंका साष्टे यांचे अर्ज अपात्र ठरले. तुर्भे प्रभाग क्रमांक 15 मधील उबाठाचे शत्रुघ्न पाटील आणि ऐरोलीत प्रभाग क्रमांक 4 चे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ॲड.अरविंद माने यांचेही अर्ज बाद करण्यात आले.
बुधवारी अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी अर्ज छाननीचे काम करत होते. कागदपत्रांची पूर्तता आणि तांत्रिक अडचणींवर आक्षेप नोंदवत अर्ज बाद करण्याची मागणी सर्वच उमेदवार करताना दिसून आले. ऐरोलीत शिंदेसेनेचे विजय चौगुले आणि भाजपचे नवीन गवते यांच्यात अर्ज छाननी करताना आक्षेप घेतल्याने वाद झाला. तु बाहेर ये बघतो तुला अशा पध्दतीने दमबाजी करण्यात आली.