मुंबई : मुंबईत क्लायमेट वीकची मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी घोषणा केल्यानंतर मुंबईचे समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी मदतीचे हात पुढे आले आहेत.‘जल्लोष: क्लीन कोस्ट्स, रिस्टोअर द शोर’ या मोहिमेअंतर्गत बुधवारी 400 हून अधिक युवक, नागरिकांनी जुहू चौपाटीची सखोल स्वच्छता केली. तब्बल 1,946 किलो प्लास्टिक कचरा संकलित केला आहे.
प्रोजेक्ट मुंबई, युनिसेफ इंडिया आणि युवाहच्या ग्रीन रायझिंग उपक्रमाच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात आली असून क्लायमेट वीकपर्यंत मुंबईच्या किनाऱ्यांचे पुनरुज्जीवन हा याचा मुख्य हेतू आहे. मुंबई महानगरपालिका, राज्य हवामान कृती कक्ष, माझी वसुंधरा, एनएसएस, नाईन इज माईन आणि महाराष्ट्र यूथ फॉर क्लायमेट ॲक्शन या संस्थांचाही यात सहभाग होता.
सकाळी जुहू कोळीवाड्यात हे स्वयंसेवक उतरले. त्यांनी समुद्रकिनारा स्वच्छ केला. संकलित कचऱ्याचे वर्गीकरणही केले. किनारपट्टी पुनर्स्थापना आणि शाश्वत जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमातून युवक आणि नागरिकांच्या सामूहिक कृतीची ताकद दिसून आली.
यावेळी जनरेशन अनलिमिटेड (युनिसेफ) मुख्य कार्यकारी अधिकारी केविन फ्रे म्हणाले की, जेव्हा तरुण एकत्र येत सामाजिक कृती करतात, तेव्हा त्या बदलांची दखल जगभर घेतली जाते. ग्रीन रायझिंगच्या माध्यमातून आम्ही युवकांना हवामान कृतीला दीर्घकालीन सामाजिक प्रभावामध्ये रुपांतरीत करतील यासाठी तयार करीत आहोत.
असे उपक्रम नागरिकांना आपल्या शहराची जबाबदारी स्वीकारायला प्रेरित करतात. अशा छोट्या पण सातत्यपूर्ण कृतींमुळे दीर्घकालीन बदल घडतात आणि एक सक्षम भविष्य निर्माण होते असा विश्वास प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक शिशिर जोशी यांनी व्यक्त केला. युनिसेफ महाराष्ट्रचे प्रमुख संजय सिंह यांनी, नागरिक आणि युवक एकत्र येतात, तेव्हा हवामान बदलासारख्या क्षेत्रातही प्रभावी काम होऊ शकते असा विश्वास व्यक्त करीत मुंबईत होणारा क्लायमेट वीक यशस्वी करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील, असे सांगितले.
या कार्यक्रमात मुंबईतील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, युवाह इंडियाचे प्रमुख जॉर्जिया व्हॅरिस्को, वॉश-सीसीईएस तज्ज्ञ युसुफ कबीर, युनिसेफ मुंबईचे सुधाकर बोबडे, माझी वसुंधराच्या मिशन डायरेक्टर अभिनेत्री अनुरिता झा, तसेच महाराष्ट्र शासनातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध विकास भागीदार उपस्थित होते.