

मुंबई : दंत उपचारादरम्यान एका 78 वर्षीय रुग्णाच्या दातांची कॅप घसरुन वायुमार्गात अडकल्याची घटना समोर आली आहे. यानंतर रुग्णाला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून विनाऑपरेशन ब्रोन्कोस्कोपद्वारे अडकलेली कॅप काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
मुंबईतील 78 वर्षीय रहिवासी असलेले रुग्ण, विनायक शाह (नाव बदलले) हे दातांना कॅप लावण्यासाठी दंतवैद्याकडे गेले होते, या प्रक्रियेदरम्यान अनपेक्षितपणे ही कॅप घसरून श्वसननलिकेच्या मार्गातून उजव्या बाजूच्या फुप्फुसातील वायुमार्गात अडकली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडे धाव घेतली. जिथे तज्ज्ञांच्या टिमने त्वरीत उपचार करत पुढील धोका टाळण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात पोहोचताच, वैद्यकीय पथकाने तत्काळ आपत्कालीन ब्रोन्कोस्कोपीची तयारी केली आणि अथक प्रयत्नानंतर अडकलेली कॅप काढण्यात डॉक्टर यशस्वी झाले.
पल्मोनोलॉजिस्ट आणि चेस्ट मेडिसिन स्पेशॅलिस्ट डॉ. अभिजित अहुजा सांगतात की, रुग्णाच्या उजव्या बाजूच्या मुख्य फुफ्फुसाकडे जाणाऱ्या वायुमार्गात दाताची कॅप अडकलेली होती. जी प्रमुख श्वसनमार्गांपैकी एक आहे. ताबडतोब भूलतज्ज्ञ आणि एंडोस्कोपी तंत्रज्ञांचा समावेश असलेली आमची टीम एकत्र आली आणि भूल देऊन सौम्य वेदनाशामक औषधांसह ब्रोन्कोस्कोपी केली.
एंडोस्कोपिक फोर्सेप्सच्या मदतीने, कोणतीही शस्त्रक्रिया न करता 10 मिनिटांपेक्षा कमी वेळात ही वस्तू यशस्वीरित्या काढून टाकण्यात आली. फुफ्फुसांना कोणतीही दुखापत किंवा संसर्ग नसल्याने, रुग्ण पूर्णपणे बरा झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याला सोडण्यात आले.
अशा घटना दुर्मिळ असल्या तरी प्रसंगावधान राखत योग्य उपचाराने यातून सुरक्षित राहता येते. दंत प्रक्रियेदरम्यान, विशेषतः जेव्हा भूल दिली जाते, तेव्हा घशाची जागा बधीर होते व कधीकधी उपचारागरम्यान एखादी लहान वस्तू घशात जाऊ शकते. याबाबत रुग्ण आणि दंत चिकित्सक या दोघांमध्येही जागरूकता महत्त्वाची आहे, असा सल्लाही डॉ. अहुजा यांनी दिला.