मुंबई : गणेश विसर्जनावेळी ट्रक समुद्रातील वाळूमध्ये रुतू नये यासाठी सात कोटी रुपये खर्च करून लोखंडी प्लेट खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षीही मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रातच होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळ व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यावर्षी समुद्रात अथवा नैसर्गिक स्थळी गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी होती. यामुळे मोठा पेच निर्माण झाल्याने अपवादात्मक परिस्थितीचा विचार करीत सहा फुटांवरील गणेशमूर्तींना समुद्रात विसर्जनाला परवानगी देण्यात आली होती. पुढील वर्षी ही परवानगी असेल किंवा वेगळा निर्णय होईल याबाबत आताच काही सांगता येणार नाही. असे असताना महापालिकेने मात्र समुद्रातील गणेश विसर्जनाची आतापासूनच तयारी केली आहे.
मोठ्या गणेशमूर्ती घेऊन येणारी वाहने वाळूमध्ये रूतू नयेत म्हणून वाळूच्या पृष्ठभागावर अंथरण्यासाठी 6 मीटर लांबी व 1.82 मीटर रुंदी तसेच 16 मी.मी. जाडीच्या अतिरिक्त नवीन 561 नग स्टील प्लेट्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षी मोठ्या गणेश दरम्यान वाळूमध्ये गणेशमूर्तींची वाहने रुतू नयेत, यासाठी सध्या असलेल्या प्लेट कमी पडत आहेत. त्यामुळे नवीन प्लेट खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेच्या ग्रँटरोड डी विभागाकडून सांगण्यात आले.