

मुंबई : “काय सुंदर पेंटिंग आहे!”, “अरे या अजिंठाच्या लेणी बघ...हुबेहूब वाटतायत ना!” अशा प्रकारच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया कॅनव्हासवर अवतरलेल्या चित्रांना मिळत होत्या. निमित्त होते, नेहरू सेंटर येथे भरलेल्या मुंबई आर्ट फेअरचे! या चित्र महोत्सवात देशातील अडीचशेहून अधिक कलाकारांनी 3000 कलाकृतींद्वारे आपली कला सादर केली आहे.
त्यांच्या या कलांमध्ये ‘मूर्त-अमूर्त कलासंगम’ पाहायला मिळत आहे. मुंबई आर्ट फेअरच्या सहाव्या पर्वात प्रस्थापित कलाकारांपासून ते उदयोन्मुख कलाकारांपर्यंत तसेच कोल्हापूर, जळगांव, लातूरपासून ते लडाख- कन्याकुमारीपर्यंतच्या कलाकारांच्या कलाकृती पाहायला मिळतात.
या वर्षीच्या रंगोत्सवात निसर्गचित्रे, व्यक्तीचित्रे, वास्तवदर्शी चित्रे, शहरचित्रे, धार्मिक चित्रांपासून ते वैयक्तिक अनुभूतींपर्यंत विविध शैली व विषयांवरील चित्रे त्यांच्यात सखोल दडलेल्या अर्थासह येथे पाहण्याची अनोखी संधी या निमित्ताने मुंबईकरांना मिळाली आहे.
मुंबई आर्ट फेअरचे संचालक राजेंद्र पाटील म्हणाले, वास्तवाऐवजी भावना, संवेदना, कल्पना आणि विषयभावांवर भर देत विविध कलाकार आणि शैली एकत्रित आणणे हे मुंबई आर्ट फेअरच्या सहाव्या पर्वाचे उद्दिष्ट आहे. या कला प्रदर्शनात कलाकार ॲबस्ट्रॅक्ट कला, निसर्गचित्रे, वास्तवदर्शी चित्रे, बौद्ध धर्म इत्यादी विविध विषयांवरील कलाकृती सादर करणार आहेत.
विषयांचे वैविध्य आणि अमूर्त कॅनव्हासचे प्रदर्शन
प्रदर्शनामधील कलाकारांमध्ये ओम थडकर, अश्विन कुमार, देव मेहता, बीना सुराणा, विजय कुमावत, शिरीष कथले, अंजुम शाह, रोहन कुंथले असे कलाकार आहेत. त्यांच्या कलाकृतींमध्ये अलंकारिक आणि प्रतीकात्मक कलाकृतींपासून ते अमूर्त, प्रायोगिक आणि वास्तववादी कलाकृतींचा समावेश आहे.
लँडस्केप्सच्या चाहत्यांसाठी पर्वणी
प्रदर्शनामध्ये लँडस्केप्सच्या चाहत्यांसाठी पर्वणी आहे. अमूर्त, अर्ध-अमूर्त लँडस्केप्सपासून ते रोमँटिक, खेडूत, हंगामी आणि शहरी लँडस्केप्सपर्यंत कलाकृतींचा समावेश आहे. वर्षा पाटील, रविशंकर टी आणि कार्तिकेय खटाऊ यांचे लँडस्केप्स, वत्सला ठाकूर, सुनंदिनी जयंत, डॉ. जेसिका सेराव यांची फुलांची दृश्ये, तर रुपाली मानसिंहका यांचे विखुरलेले प्रकाश असलेली चित्रे आकर्षण ठरले आहे.
मुंबई आर्ट फेअरमधील माझे हे तिसरे वर्ष आहे. यावर्षी मी अजिंठा मॅग्निफिशिएंट विषय घेतला आहे. लेणीतील चित्रांचा अभ्यास करून मी चित्रे काढली आहेत. यामध्ये चित्रांतील बॅकग्राउंड मी स्वतः तयार केले आहे. आपली पारंपारिक कला टिकून राहावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील असते. त्यामध्ये मुंबई आर्ट फेअरचा मोलाचा वाटा आहे.
उज्वला सुरवाडे, चित्रकार, जळगांव
मी गेली 20 वर्षे चित्रांचे काम करत आहे. माझे शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले. पेंटिंगचा डिप्लोमा केला आहे. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्यामुळे यामध्ये करिअर करण्याचे ठरवले. या कलेमध्ये सातत्य दाखवले आणि गुणवत्तापूर्ण काम केले तर यामध्ये उत्तम करिअर होऊ शकते. मुंबई आर्ट फेअरमुळे चांगले व्यासपीठ मिळाले. स्वतःची ओळख निर्माण झाली.
युवराज पाटील, चित्रकार, कोल्हापूर
मी पदवीनंतर इंजिनिअरींग केले. चारकोल पेन्सिल वर्क हा माझा विषय आहे. कलेवर निष्ठा ठेवायला हवी. त्यामुळे तुमचे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतात. गेल्या काही वर्षांपासून मी मुंबई आर्ट फेअरमध्ये सहभागी होतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद आहे.
ओम थडकर, चित्रकार, लातूर