

घाटकोपर : कुर्ला येथे रेशनच्या धान्याचा काळाबाजार करण्यासाठी नेण्यात येणारा तब्बल 2 हजार 38 किलो तांदूळ पोलिसांनी ताब्यात घेतला असून टेम्पोसह अभिषेक राजभर आणि अजयकुमार गुप्ता या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कुर्ला पश्चिम पाईपलाईन, विनोबा भावे नगर येथे रात्री 8 च्या सुमारास उभ्या असलेल्या टेम्पोत विविध रंगांच्या गोणीत रेशनचा तांदूळ भरला जात होता. याबाबत आई-बाबा फाऊंडेशन या संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते योगेश मौर्य तसेच कुर्ला शिधावाटप कार्यालयातील निरीक्षक रामराजे भोसले यांनी कुर्ला पोलिसांत तक्रार दिली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सदर माल ताब्यात घेतला. त्यात 41 गोण्या तांदूळ आणि 100 किलो गहू होता. या मालाची किंमत जवळपास 85 हजार 45 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
हा माल कुर्ला येथील 32 ई-शिधावाटप दुकानांतील होता. सदर गुन्ह्याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनीष मोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.