

मुंबई : भारतातील सर्वाधिक वर्दळीच्या मुंबई विमानतळावर एका परदेशी महिला प्रवाशाला मंगळवारी पहाटे अचानक प्रसूती कळा सुरु झाल्या. विमानतळाच्या वैद्यकीय कामकाज पाहणाऱ्या पथकाच्या समन्वयामुळे विमानतळाच्या रुग्णवाहिकेतच एका बालिकेचा सुरक्षित जन्म झाला.
10 फेब्रुवारीला पहाटे 5.17 वा विमानतळाच्या वैद्यकीय पथकाला एका प्रवासी महिलेला वैद्यकीय मदतीची गरज असल्याचा कॉल आला. ही 26 वर्षीय महिला प्रवासी (टांझानियाची नागरिक) 36 आठवड्यांची गर्भवती होती. प्रवास करत असताना तिला अचानक तीव्र प्रसूती कळा सुरू झाल्या. काही मिनिटांतच डॉक्टर घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना समजले की, प्रवासी महिलेला तीव्र प्रसूती कळा होत होत्या. प्रसूती कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यानंतर महिलेला रुग्णवाहिका बग्गीवरील स्ट्रेचरवर हलविण्यात आले.
पहाटे 5:40 वाजता, विमानतळाचे वैद्यकीय पथक आणि एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका हॉस्पिटलकडे रवाना झाली. धावत्या रुग्णवाहिकेमध्येच विमानतळाच्या वैद्यकीय पथकाने निर्णायकपणे पावले उचलली आणि पहाटे 5:45 वाजता रुग्णवाहिकेच्या आत एका मुलीचा जन्म झाला. विमानतळाचे वैद्यकीय पथकातील डॉ. कृतिका, डॉ. मधु आणि डॉ. किसले, परिचारका माधुरी आणि अशोक तसेच रुग्णवाहिका चालक ओंकार यांच्या सहकार्यामुळे एका नव्या जीवाची सुरक्षित सुरुवात झाली.