Mumbai Pollution: मंद वाऱ्यांमुळे प्रदूषणाचा विळखा; पालिकेचा दावा

वाहनांचा धूर, रस्त्यावरील धूळ जमिनीलगत साचल्याने धुरकट वातावरण
Mumbai Pollution
Mumbai PollutionPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबई शहर देशात तिसऱ्या, तर जगातील पाचव्‍या क्रमांकाचे प्रदूषित शहर बनले आहे. प्रदूषणाच्या इतर कारणांबरोबरच हवेचा वेग मंदावल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.

मुंबईतील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत,मात्र तरी सुद्धा प्रदूषणाची तीव्रता अधिक जाणवत आहे.

वाहनांमधून बाहेर पडणारा धूर आणि रस्त्यांवरील धूळ हवेत दूरवर पसरण्याऐवजी जमिनीलगत साचून राहत असल्याने शहरात धुरकट वातावरण निर्माण होत आहे. तसेच बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नोटिसा बजावण्यासह दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

Mumbai Pollution
Mumbai Tree Cutting: गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठी १५२४ वृक्षांवर कुऱ्हाड!

मुंबईची भौगोलिक परिस्थिती, समुद्राकडून वाहणारे वारे आणि हवेचा मंदावलेला वेग यांचा प्रदूषणावर परिणाम होत असल्याचे ढाकणे यांनी स्पष्ट केले. समुद्राकडून मुंबईच्या दिशेने वारे वाहताना हवेतील आर्द्रतेत वाढ होऊ शकते. मात्र, हवेचा वेग सातत्याने वाढल्यास प्रदूषित हवा विखुरण्यास मदत होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

स्वच्छ इंधन, पाण्याच्या फवारणीवर भर

महापालिकेच्या क्लायमेट ॲक्शन प्लॅनअंतर्गत प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने आणखी प्रभावी उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. शहरातील बेकऱ्यांमध्ये पारंपरिक इंधनाऐवजी सीएनजी, पीएनजी किंवा विजेसारख्या स्वच्छ इंधनाचा वापर वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Mumbai Pollution
Nerul Crime News: प्रेयसी दुर्लक्ष करत असल्याने हत्या; नेरूळ बस स्थानकाजवळील घटना

बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण मोजणारी यंत्रणा बसवून हवेच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवली जात आहे. रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी विशेष वाहनांच्या माध्यमातून पाण्याची फवारणी केली जात आहे. हवेत पाण्याचे तुषार सोडून धूलिकण खाली बसविण्याचाही प्रयत्न केला जात आहे.

नियम मोडणाऱ्या बांधकामांना नोटिसा

प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार बांधकाम थांबविण्याच्या नोटिसा देण्यासह दंडात्मक कारवाईही केली जात आहे. विविध विभागांच्या समन्वयातून प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे डॉ. ढाकणे यांनी सांगितले.

Mumbai Pollution
Teacher workload: शिक्षक गुंतले १५६ प्रकारच्या अशैक्षणिक कामात; अध्यापनाकडे दुर्लक्ष

‘समीर’ ॲपवरूनच घ्या अधिकृत माहिती

हवेच्या गुणवत्तेची माहिती मिळवण्यासाठी खासगी मोबाईल ॲपवरील आकडेवारीवर पूर्णपणे अवलंबून राहू नये, असे आवाहन ढाकणे यांनी केले. प्रदूषणाची अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘समीर’ ॲपचा वापर करावा. वेगवेगळ्या स्रोतांवरील आकडेवारीत फरक असू शकतो. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेची स्थिती समजून घेताना अधिकृत माहितीचा आधार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

logo
Pudhari News
pudhari.news