कोपरखैरणे: प्रेयसी दुर्लक्ष करत असल्याने तिच्यावर चाकूचे वार करून हत्या करण्यात आल्याची घटना नेरूळ येथे घडली. पोलिसांनी प्रियकर दानिश अन्सारी याला अटक केली. वडाळा येथे राहणारे सादिया शेख आणि दानिष आन्सीरी यांच्यात चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
मात्र गेल्या काही दिवसापासून सादिया आपल्याकडे दुर्लक्ष करते याचा दानिशला राग होता. २० तारखेला ती नेरुळ येथे जाणार असल्याची माहिती मिळाल्यावर दानिश तिच्या मागे गेला आणि बस थांब्यावर तिला गाठले.
दोघांचे वाद झाले त्यातून दानिशने सोबत आणलेल्या चाकूने तिच्या अंगावर सपासप वार केले. ही घटना कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व जखमी सादियाला रुग्णालयात दाखल केले. तिने दिलेल्या जवाबावरून पोलिसांनी दानिशच्या विरोधात हत्येचा प्रयत्न म्हणून गुन्हा नोंद केला मात्र बुधवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
दरम्यान पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि दानिश याला वडाळा येथून अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दानिश याने सादिया हिच्या प्रेमापोटी धर्म परिवर्तन केले होते.