

मुंबई /ठाणे: दिवाळी साजरी करताना झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे महामुंबईत दोन दिवसांत तब्बल ४०८ ठिकाणी आगी लागल्या. मुंबईतच १४२ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. त्यापैकी १३७ आगी फटाक्यांमुळे लागल्याचे अग्निशामन दलाकडून सांगण्यात आले.
तर मीरा-भाईंदरमध्ये ११०, कल्याण-डोंबिवलीत ७०, भिवंडीत १२ ठिकाणी आणि नवी मुंबईत तब्बल ७४ आगीच्या घटनांची नोंद झाली. यातील बहुतांश आगी रॉकेट तसेच हवेतील इतर फटाक्यांमुळे लागल्याचे पुढे आले आहे.
अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरातील रुनवाल टॉवरमध्ये ७ नोव्हेंबरच्या रात्री लागलेल्या आगीत ५६ वर्षीय सुरक्षा रक्षक धनपत महातू यांचा लिफ्टमध्ये अडकून धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. घाटकोपर पूर्व येथील रॉयल अल्टेझा इमारतीत आगीमुळे तिघे जखमी झाले. त्यापैकी एका रहिवाशाला २७ टक्के भाजल्याचे नमूद करण्यात आले आहे.
डोंगरीतील हाजी कासम चाळ परिसरात दुकाने, गॅरेज आणि लाकडी बांबूच्या चाळींना आगीने वेढल्याने मोठे नुकसान झाले. कांदिवली पश्चिम येथील सिरिया इमारतीतील जनरेटर रूम आणि ड्राय रिफ्युज एरिया आगीत उद्ध्वस्त झाला.
गोरेगाव पूर्वेतील रॉयल पाम्स परिसरातील इमारतीच्या १९ व्या मजल्यावरील सदनिकेच्या बाल्कनीचेही नुकसान झाले. दादर पश्चिम येथील कामगार स्टेडियम परिसरातील लाकूड, बांबू आणि बांधकाम साहित्याच्या साठवणुकीच्या ठिकाणीही आग लागली होती.
दिवाळीच्या कालावधीतील मागील दोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, सन २०२४ मध्ये मुंबईत आगीच्या एकूण २६२ घटनांची नोंद झाली होती. त्यापैकी ८० घटना फटाक्यांमुळे घडल्या होत्या. या घटनांमध्ये ३ जण जखमी झाले होते. सन २०२५ मध्ये आगीच्या घटनांची संख्या २८९ वर पोहोचली होती. त्यापैकी ११३ घटना फटाक्यांमुळे घडल्या होत्या. या वर्षी कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची नोंद नव्हती.
पाच यंत्रणांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह
मुंबईतील उंच इमारतींमधील अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, ड्राय रिफ्युज एरिया, डिझेल जनरेटरची तपासणी, अनधिकृत बांधकामे आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमधील ज्वलनशील साहित्याचा साठा यावर महापालिकेने पुरेसे नियंत्रण ठेवले नसल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
अग्निशमन दलाने सणापूर्वी अग्निसुरक्षा तपासण्या आणि फायर सेफ्टी ऑडिट केले नाहीत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने विषारी धुराच्या परिणामांवर नियंत्रण ठेवले नाही, तर पोलिसांनी फटाक्यांची अवैध साठवणूक आणि धोकादायक फटाक्यांच्या वापरावर प्रभावी कारवाई केली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
मुंबई अग्निशमन दलाचे आवाहन
मुंबई शहर व उपनगरांमध्ये गेल्या २४ तासांत फटाक्यांमुळे १४२ पेक्षा अधिक आगीच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी फटाके फोडताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाने केले आहे.
तसेच आग लागल्यास किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मुंबई अग्निशमन दलाच्या १०१ या क्रमांकावर तसेच ९०७६३३३१०१, ९०७६३३३१०२, ९०७६३३३१०३, ९०७६३३३१०४ आणि ९०७६३३३१०५ वर मुंबई अग्निशमन दलाशी संपर्क साधावा. किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
ठाण्यात ५० रहिवाशांची सुखरूप सुटका
ठाण्यातील रहेजा कार्लाइन इमारतीला भीषण आग लागून आठव्या ते चौदाव्या मजल्यापर्यंत आगीचा फैलाव झाला. या दुर्घटनेत अडकलेल्या ५० रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. सुदैवाने सर्व घटनांमध्ये जीवितहानी टळली. कल्याण-डोंबिवलीतील ७० घटनांपैकी ६८ आगी फटाक्यांमुळे लागल्या.
गृहसंकुलांच्या गॅलऱ्या, निर्माणाधीन इमारती, वाहने आणि झाडांना आगीची झळ बसली. मीरा-भाईंदरमध्ये कनकिया अग्निशमन केंद्राच्या हद्दीत सर्वाधिक ३०, कल्पना चावला केंद्रात २७, सिल्वर पार्कमध्ये १९, पेणकर पाडा येथे १५, नवघरमध्ये १४ आणि उत्तनमध्ये दोन आगींच्या घटनांची नोंद झाली.
मीरारोडच्या प्लॅनेट एरिया येथे मंडप साहित्याला भीषण आग लागली, तर एस. एम. हायस्कूलची एक वर्गखोली जळाली. काशिमीरा येथील मांडवीपाडा झोपडपट्टीतील पाच ते सहा झोपड्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.
भिवंडीतील काप आळीत शॉर्टसर्किटमुळे सहा दुकाने, कामतघर येथे दिव्यामुळे बॅगचे दुकान, तर ओसवालवाडीत फटाक्यामुळे लाकडी बॅटचा कारखाना जळून खाक झाला. गौरीपाडा येथे भंगार गोदामातून लागलेली आग चाळीतील पाच खोल्यांपर्यंत पोहोचली. ठाण्यातील रहेजा कार्लाइन इमारतीतील बचावकार्यात ड्रोनचा वापर करून अडकलेल्या रहिवाशांचा शोध घेण्यात आला. धुरामुळे लिफ्ट बंद असल्याने शिडी आणि स्ट्रेचरच्या साहाय्याने त्यांना बाहेर काढण्यात आले.
वाशी, नेरूळमध्ये सर्वाधिक घटना
महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या आकडेवारीनुसार, वाशी येथे रॉकेटमुळे आगीच्या २३, अन्य कारणांमुळे दोन अशा एकूण २५ घटनांची नोंद झाली. नेरूळमध्ये आगीच्या १९ आणि बचावकार्याच्या दोन घटना घडल्या.
ऐरोलीत आगीच्या १३, कोपरखैरणे येथे आगीच्या १२ आणि बचावकार्याची एक घटना नोंदविण्यात आली, तर सीबीडी बेलापूर येथे आगीच्या सात घटनांची नोंद झाली. अशा प्रकारे पाच विभागांमध्ये आगीच्या एकूण ७४ घटना घडल्या, अशी माहिती देण्यात आली.
विलेपार्लेत फटाक्यांच्या वादातून तरुणाची हत्या
विलेपार्ले येथे नानू ऊर्फ शुभंकर जगदेव मुखिया (१९) या तरुणाची तिघांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजता येथील सहकार भंडार, एचडीएफसी बॅंकेसमोर घडली. हत्येनंतर पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना अवघ्या पाच तासांत जुहू पोलिसांनी अटक केली.
त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. इतर दोन आरोपींमध्ये राहुल संतोष मंडल आणि रवीकुमार सर्वनांन देवेंद्र यांचा समावेश असून अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
फटाके फोडण्यावरुन झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव गावडे यांनी दुजोरा दिला. नानू मुखिया हा नेहरुनगर परिसरात राहत असून रविवारी रात्री तो त्याच्या चार मित्रांसोबत फटाके फोडत होते.
यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी त्यांना तिथे फटाके फोडण्यास विरोध केला होता. मात्र त्यानी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. या वादानंतर तिन्ही आरोपींनी नानूला शिवीगाळ करुन बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण केली होती. त्यात तो बेशुद्ध झाला होता. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी तेथून पळून गेले होते.
हा प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी मारहाणीत जखमी झालेल्या नानूला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याला उपचारादरम्यान मृत घोषित केले. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी हत्येसह गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना अवघ्या पाच तासांत पोलिसांनी राहुल मंडल आणि रवीकुमार देवेंद्र यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
आरोपीला पोलीस कोठडी
चौकशीत त्यांनीच फटाके फोडण्यावरुन झालेल्या वादातून नानूची हत्या केल्याची कबुली दिली. ते तिघेही विलेपार्ले येथील नेहरुनगर परिसरातील रहिवाशी आहे. अटकेनंतर राहुल आणि रवीकुमारला सोमवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.
यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. अल्वयीन मुलाला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले. दरम्यान शवविच्छेदनानंतर नानूचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपविण्यात आले होते.